
येमेनच्या तुरुंगात बंद असलेली भारतीय नर्स निमिषा प्रियाच्या सुटकेसाठी भारतातून जोरदार प्रयत्न सुरु आहेत. आज या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी झाली. निमिषा प्रियावर येमेनमध्ये हत्येचा आरोप आहे. 16 जुलै रोजी तिला फाशीची शिक्षा होणार होती. पण भारतातून सुरु असलेल्या प्रयत्नांमुळे तिची फाशी पुढे ढकलण्यात आली. आज ज्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. सेव्ह निमिषा प्रिया आंतरराष्ट्रीय कृती परिषदेने ही याचिका दाखल केली आहे. निमिषावर तलाल महदीच्या हत्येचा आरोप आहे. महदीच्या कुटुंबासोबत चर्चा करण्यासाठी मध्यस्थांची डिप्लोमॅटिक टीम बनवावी अशी याचिकाकर्त्यांची मागणी आहे. न्यायालयाने याचिकाकर्त्याला सरकारसमक्ष सादरीकरण करण्यास सांगितलं. सरकारने याचिकाकर्त्याला भारत सरकारशी संपर्क साधण्यास परवानगी दिली आहे.
दीनेश नायर हे सेव्ह निमिषा प्रिया आंतरराष्ट्रीय कृती परिषदेचे महत्त्वाचे सदस्य आहेत. ते म्हणाले की, “निमिषा प्रियाच आयुष्य वाचवण्याच्या मानवी मोहिमेत प्रत्येकानं सहभागी व्हावं. वयोवृद्ध आई आणि निमिषाची लहान मुलगी यांचा विचार करा” महदी कुटुंबासोबत चर्चा करण्यासाठी सेव्ह निमिषा प्रिया आंतरराष्ट्रीय कृती परिषदेने 6 सदस्यीय टीमचा प्रस्ताव दिला आहे. यात कृती परिषदेचे दोन सदस्य, मर्कजचे दोन सदस्य आणि केंद्र सरकार नियुक्त दोन सदस्य अशी टीम बनवण्याची मागणी करण्यात आली आहे.
दिनेश नायर काय म्हणाले?
सर्वोच्च न्यायालय आज अनुकूल निर्णय घेईल अशी अपेक्षा आहे. निमिषा प्रियाच्या सुटकेसाठी मृत व्यक्तीच्या कुटुंबासोबत चर्चा करण्यासाठी टीम बनेल अशी आम्हाला आशा आहे असं दिनेश नायर म्हणाले.
प्रकरण काय?
केरळची नर्स निमिषा प्रियावर येमेनी बिझनेस पार्टनर तलाल अब्दो मेहदीची हत्या केल्याचा आरोप आहे. वर्ष 2017 मध्ये तिला दोषी ठरवण्यात आलं. निमिषाला मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. अनेक अपील केल्यानंतरही येमेनच्या सर्वोच्च न्यायालयाने निमिषाची फाशीची शिक्षा कायम ठेवली. आता ब्लड मनी हा निमिषाचा प्राण वाचवण्याचा एक मार्ग आहे. महदी कुटुंबाने ब्लड मनी स्वीकारलं, तर निमिषाला माफी मिळू शकते. येमेनच्या शरिया कायद्यामध्ये ब्लड मनीला मान्यता आहे.
‘ग्रँड मुफ्ती ऑफ इंडिया’च्या प्रयत्नांना यश
94 वर्षीय कंथापुरम एपी अबूबक्कर मुसलियार यांना भारतात ‘ग्रँड मुफ्ती ऑफ इंडिया’ म्हटलं जातं. त्यांच्या प्रयत्नांना यश आलं. अबूबक्कर मुसलियार यांनी थेट येमेनच्या धार्मित शक्तींशी संवाद साधला. त्यामुळे 16 जुलैला होणारी निमिषाची फाशी टळली.