
जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला, या हल्ल्यामध्ये 26 जणांना आपला जीव गमवावा लागला तर अनेकजण जखमी झाले. या घटनेनंतर भारतानं पाकिस्तानविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे, पाकिस्तानच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहे. सिंधू पाणी वाटप कराराला स्थगिती देण्यात आली आहे. आयात निर्यात बंद करण्यात आली आहे. टपाल सेवाही बंद करण्यात आली आहे, एवढंच नाही तर पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करण्यात आले असून, त्यांना देश सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
याचदरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे. पंजाबच्या अटारी बॉर्डर परिसरामध्ये असलेल्या एका गावातील शेतात संशयास्पद वस्तू सापडली आहे. अटारी बॉर्डर जवळच महुआ नावाचं गाव आहे. महुआ गावातील शेतात संशयास्पद वस्तू आढळून आली आहे. ही वस्तू म्हणजे ड्रग्स तस्करी करणारे ड्रोन असल्याचा दावा स्थानिकांकडून करण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच भारतीय लष्कराच्या जवानांनी या शेताच्या परिसरामध्ये सर्च ऑपरेशन सुरू केलं आहे.
पंजाबच्या अटारी बॉर्डर नजीक असलेल्या महुआ गावाच्या गव्हाच्या शेतात, ड्रोन सारखी दिसणारी एक संशादस्पद वस्तू आढळून आली आहे. माहिती मिळताच भारतीय लष्कराचे जवान या शेतात पोहोचले, त्यांनी तिथे सर्च ऑपरेशन सुरू केलं आहे. भारतीय लष्कराकडून या शेताच्या परिसरात सर्च ऑपेरेशन सुरू आहे, वेगवेगळ्या पथकांकडून या भागात शोध मोहीम सुरू आहे. ड्रोनच्या माध्यमातून या शेतात नेमकं काय पडलं आहे, त्याचा शोध जवानांकडून घेतला जात आहे.
स्थानिकांनी केलेल्या दाव्यानुसार ड्रोनच्या माध्यमातून ड्रग्स तस्करी सुरू आहे, यातील ड्रग्स या शेतात पडलं असावं असा संशय व्यक्त केला जात आहे. यातील काही साहित्य हे भारतीय सैन्याला सापडल्याची माहिती देखील समोर आली आहे. बॉर्डर परिसरात जेवढी गव्हाची शेती आहे, त्यातील गव्हाचं पीक कापून घेण्याच्या सूचना स्थानिक यंत्रणेकडून या शेतकऱ्यांना काही दिवसांपूर्वीच देण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता या परिसरातील पीक काढणी सुरू आहे. याचदरम्यान ही घटना घडली आहे.