Thalapathy Vijay: अभिनयासाठी अभ्यासाला रामराम…दाक्षिणात्य सुपरस्टार थलपती विजय यांचे शिक्षण काय?
Thalapathy Vijay Qualification: जोसेफ विजय यांनी आज तामिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. सत्तेवर येताच त्यांनी धडाकेबाज निर्णय घेतले. दाक्षिणात्य सुपरस्टार विजय थलपती यांचे शिक्षण किती झाले आहे, तुम्हाला माहिती आहे का?

Thalapathy Vijay Qualification: दक्षिण भारतीय चित्रपटांचा सुपरस्टार जोसेफ विजय चंद्रशेखर उर्फ थलपती विजय यांच्या राजकीय जीवनाचा श्रीगणेशा अगोदर झाला. आज त्याच्यावर कळस चढला. थलपती विजय यांनी आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांचा पक्ष तामिळगा वेत्री कझगमने (TVK) तामिळनाडू विधानसभा निवडणूक 2026 सर्वाधिक जागा मिळवल्या. चेन्नईतील एक विद्यार्थी ते सुपरस्टार आणि नंतर तामिळनाडूचा मुख्यमंत्री असा जोसेफ विजय यांचा प्रवास अनेकांना हरकून टाकणारा आहे. त्यांचे जीवन अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.
अर्ध्यातूनच सोडावे लागले शिक्षण
विजय यांचे सुरुवातीचे शिक्षण हे चेन्नईतील फातिमा स्कूल त्यानंतर विरुगंबक्कम येथील बालालोक स्कूलमध्ये झाले. या काळात ते साधारण विद्यार्थी होते. या काळात त्यांनी मोठी शैक्षणिक चमक दाखवल्याचे दिसून येत नाही. ते एक साधारण विद्यार्थी होते. त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षणासाठी व्हिज्युअल कम्युनिकेशन कोर्ससाठी दाखला घेतला. पण त्यांच्या महाविद्यालयातील शिक्षणाला ब्रेक लागला. चित्रपटात काम करण्यासाठी मग त्यांनी शिक्षणाला रामराम ठोकला. अर्थात त्यांचा हा निर्णय कुटुंबियांना थोडा धक्कादायक वाटला. कारण त्यांनी एक पदवी घ्यावी असे कुटुंबियांचे मत होते. पण विजय यांनी चित्रपटाकडे मोर्चा वळवला. अर्थात तिथला त्याचा प्रवास काही सोपा नव्हता. सुरुवातीला त्याला अभिनयाची एबीसीडी शिकावी लागली. त्यानंतर मग त्यांच्या चित्रपटांना प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले. त्यांचा अभिनय, चित्रपटातील भूमिका यांनी छाप सोडली.
चित्रपटांना रामराम…राजकीय करीअरला सुरूवात
चित्रपट उद्योगात पाऊल ठेवल्यानंतर विजय यांनी मागे पाहिले नाही. एक बाल कलाकार ते एक सुपरस्टार असा त्यांचा थक्क करणारा प्रवास आहे. त्यासाठी त्यांनी स्वयंशिस्त आणि अभिनयाचे धडे गिरवले. अभिनयात स्थिरावल्यानंतर त्यांनी गेल्या दहा वर्षांपासून लोकांशी संपर्क वाढवण्यावर भर दिला. त्यांनी चाहत्यांचे जाळे विणले. फॅन क्लबच्या माध्यमातून त्यांनी थलपती पर्व सुरू केले. पण राजकारणात प्रवेश करण्यासाठी ते योग्य संधीची वाट पाहत होते. त्यांना 2026 मधील विधानसभा ही चांगली संधी मिळाली. त्यांनी नशीब आजमावले. त्यापूर्वी त्यांच्या आयुष्यात मोठे वादळ आले. पत्नी आणि मुलं सोडून गेली. पण त्यांच्या पक्षाने या निवडणुकीत महाविजय मिळवला. इतक्या वर्षांपासून सत्ता कारणात असलेल्या द्रमुक-अण्णा द्रमुक पक्षांना प्रवाहातून बाजूला सारले. आज त्यांचा तामिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून शपथविधी झाला.