थलपती विजय यांचा ‘मिड-डे मील’ मास्टरस्ट्रोक; शालेय विद्यार्थ्यांना खुश करण्यासाठी ‘हा’ पदार्थ

कामराज, करुणानिधी, एमजीआर आणि जयललिता यांचीच परंपरा पुढे नेत तमिळनाडूचं नवं सरकार आता शालेय मध्यान्ह भोजन कार्यक्रमात मोठा बदल करू शकतं. मुख्यमंत्री विजय यांची संमती मिळाली तर शाळेतल्या विद्यार्थ्यांना आठवड्यातून एकदा हा पदार्थ मिळू शकतो.

थलपती विजय यांचा मिड-डे मील मास्टरस्ट्रोक; शालेय विद्यार्थ्यांना खुश करण्यासाठी हा पदार्थ
थलपती विजय
Image Credit source: Instagram
| Updated on: Jul 30, 2026 | 10:55 AM

साऊथ सुपरस्टार थलपती विजय यांनी तमिळनाडू विधानसभा निवडणुका जिंकत आधीच एक मोठा इतिहास रचला आहे. त्यानंतर आता तमिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून ते घेत असलेले निर्णय सर्वाधिक चर्चेत आहेत. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच त्यांनी मोठमोठ्या घोषणा केल्या होत्या. यामध्ये 200 युनिट मोफ वीज, महिलांच्या सुरक्षेसाठी टास्क फोर्स यांसारख्या काही मोठ्या मुद्द्यांचा समावेश होता. त्यातच आता तमिळनाडूच्या लोकप्रिय मध्यान्ह भोजन योजनेसंदर्भात एक मोठा प्रस्ताव समोर आला आहे. तमिळनाडूचं राज्य सरकार आता सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांना आठवड्यातून एकदा दुपारच्या जेवणात चिकन बिर्याणी देण्याचा विचार करत आहे. राज्याचे शालेय शिक्षण मंत्री राज मोहन यांनी मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांच्यासमोर ही नवी कल्पना मांडली आहे.

या प्रस्तावावर बोलताना मंत्री राज मोहन म्हणाले, “राज्यातील प्रत्येक प्रमुख राजकीय कालखंडात शालेय पोषण कार्यक्रम अधिक मजबूत झाला आहे. के. कामराज यांनी सर्वांत आधी मध्यान्ह भोजन योजना सुरू केली होती. त्यानंतर कलाइग्नार करुणानिधी यांनी त्यात अंड्यांचा समावेश केला. एम. जी. आर यांनी त्याचं एका पौष्टिक भोजन कार्यक्रमात रुपांतर केलं. तर जयललिता यांनी साप्ताहिक अंड्यांचं वाटप सुरू ठेवलं होतं. हीच परंपरा पुढे चालू ठेवत सरकारी शाळांमधील मुलांना आठवड्यातून एकदा चिकन बिर्याणी देण्याची आमची इच्छा आहे.”

मिळालेल्या माहितीनुसार, हा प्रस्ताव सध्या मुख्यमंत्री विजय यांच्या विचाराधीन आहे. अद्याप त्यांनी कोणताही अंतिम निर्णय घेतलेला नाही. प्रशासकीय स्तरावर विविध बाबींचं मूल्यांकन केलं जात आहे. देशातल्या शालेय पोषण आहार कार्यक्रमांमध्ये तमिळनाडू नेहमीच अग्रेसर राहिलं आहे. माजी मुख्यमंत्री के. कामराज यांनी सुरु केलेल्या मध्यान्ह भोजन योजनेनं देशभरातील कल्याणकारी कार्यक्रमांचा पाया रचला. त्यानंतरच्या सरकारांनी जेवणातील पौष्टिक घटक आणि मेन्यूमध्ये सातत्याने सुधारणा केली.

सप्टेंबर 2022 मध्ये तत्कालीन डीएमके सरकारने प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी ‘मुख्यमंत्री नाश्ता योजना’ सुरू केली होती. नंतर या योजनेचं नामांतर ‘पेरुंथलैवर कामराज नाश्ता योजना’ असं झालं. मध्यान्ह भोजन योजनेसोबतच चालणाऱ्या या नाश्ताच्या योजनेमुळे मुलांना शाळेत दोन वेळचं पौष्टिक जेवण मिळेल, याची खात्री झाली. आता जर थलपती विजय यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली, तर गेल्या काही वर्षांत तमिळनाडूच्या शालेय पोषण आहार पद्धतीत झालेला हा सर्वांत मोठा आणि ऐतिहासिक बदल असेल.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us