
डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते,की घटना चांगली की वाईट यातील लिखाणावरून नाही तर त्याचा वापर कसा केला जातो, यावर अवलंबून आहे. सहकाराबाबत माझं तेच मत आहे. सहकाराचा वापर कसा केला जातो, त्यावर सहकार चांगलं की वाईट ठरतं. सहकारालाही बाबासाहेबांचं वाक्य लागू होतं असे राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी म्हटले आहे.
सहकार शुद्ध विचार आणि आचरणातून अवलंबला तर तो नक्कीच समृद्धीचा महामार्ग होऊ शकतो. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ. हे चांगलं घोष वाक्य दिलं होतं. आता एकमेकाविरोध करू, अवघी संस्था बुडवू असं धोरण काही लोक अवलंबतात. त्यामुळे सहकारात काही दोष निर्माण झाले आहेत. विचित्र मानसिकतेतून काही लोक काम करतात त्यातून सहकार पुढे जाणार नाही. दुसऱ्यांच्या चुका शोधल्याने आपण यशस्वी होऊ हा भ्रम आहे. आपण सहकाराकडे कसे बघतो आणि वागतो हे आधी बघा. आणि सहकार स्वत:आचरणात आणलं पाहिजे असेही राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी यावेळी सांगितले.
सहकारात जनता, संस्था चालवणारी मंडळी आणि सरकारने निर्माण केलेल्या सहकारी खात्यातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा जवळचा संबंध आहे. जनतेमुळे सहकारी संस्था निर्माण होतात. जनतेतून भागभांडवल तयार होतं, जनता कर्ज घेते आणि ठेवीही ठेवते. सहकार क्षेत्र जनतेमुळे वाढते आणि फोफावते. परंतू सहकारी संस्था उतरणीला लागताच सहकार लयाला जाते. त्याला केवळ संस्था चालक आणि सहकारी अधिकारी जबाबदार असतात असेही राज्यपाल हरिभाऊ बागडे यावेळी म्हणाले.
१०० टक्के संस्था चालक आणि १०० टक्के अधिकारी जबाबदार असतात असं मत नाही. पण थोडे जरी बिघडले तरी अनेकांना घेऊन बुडतात. त्यामुळे सहकार चांगलं चालवलं पाहिजे. एखाद्या संस्थेबाबत अफवा उठवली तर लोक घाबरतात. त्यामुळे सहकाराकडे अशा दृष्टीने पाहू नये. नाही तर सहकार अडचणीत येऊ शकते असेही राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी सांगितले.
सहकाराच्या मंदिरात येताना राजकीय पक्षाचे जोडे बाहेर काढून या असं यशवंतराव चव्हाण म्हणाले होते. पक्षाचा अभिनिवेश बाजूला ठेवून दुर्दम्य इच्छाशक्ती संस्था चालक आणि अधिकाऱ्यात करावी लागणार आहे. असे अनेक संस्था चालक आहेत. त्यामुळे ५०० ते १००० कोटींचा व्यवसाय होत आहे. त्यावर लाखो कर्मचारी अवलंबून आहे.सहकार क्षेत्रातील संख्यात्मक वाढ आणि गुणात्मक वाढ गोरगरिबांच्या प्रगतीचा महामार्ग होऊ शकतो. प्रगतीमुळेच समृद्धी येऊ शकते. व्रतस्थ आणि प्रशस्त विचाराने सहकार चालवलं पाहिजे असेही हरिभाऊ बागडे यांनी यावेळी म्हटले आहे.