Twisha Sharma Death Case: मॉडेल ट्विशाचा संशयास्पद मृत्यू, CCTV मध्ये मृत्यूची वेगळीच तारीख, त्या 60 मिनिटांत नेमकं काय घडलं?
Twisha Sharma Death Case: मॉडेल ट्विशाच्या राहत्या घरातील CCTV समोर आला आहे. या CCTV मध्ये ट्विशाच्या निधनाची तारीख आणि कुटुंबियांनी सांगितलेली तारीख यात फरक दिसत आहे. त्यामुळे नेमकी काय भानगड आहे? जाणून घ्या

मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये राहणारी 31 वर्षीय मॉडेल ट्विशा शर्माच्या मृत्यूमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. लग्नाला अवघे ५ महिने पूर्ण झाले असतानाच ट्विशाने आपले आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. एम्सच्या (AIIMS) प्राथमिक शवविच्छेदन (Post-Mortem) अहवालानुसार, तिने फाशी घेऊन आत्महत्या केल्याचे म्हटले आहे. मात्र, ट्विशाच्या कुटुंबीयांनी हा आत्महत्येचा दावा पूर्णपणे फेटाळून लावत, तिची हुंड्यासाठी सासरच्यांनी हत्या केल्याचा गंभीर आरोप केला आहे.
सीसीटीव्ही फुटेज आणि चॅट्सवरून संशय बळावला
या प्रकरणाचा तपास जसजसा पुढे सरकत आहे, तसतसे अनेक धक्कादायक खुलासे आणि सीसीटीव्ही (CCTV) फुटेज समोर येत आहेत. ट्विशाच्या मृत्यूच्या काही वेळ आधीचे आणि नंतरचे सीसीटीव्ही फुटेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये काय आहे?
घटनेच्या काही वेळ आधी ट्विशा घराच्या छताकडे जाताना दिसते. यानंतर, साधारण एका तासाने तिचा पती समर्थ सिंग आणि इतर दोन जण तिला जिन्यावरून बेशुद्ध अवस्थेत खाली घेऊन जाताना दिसतात. जिन्यावरच तिला शुद्धीवर आणण्यासाठी ‘सीपीआर’ (CPR) देण्याचा प्रयत्नही केला जात असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.
वेळेची आणि तारखेची छेडछाड?
व्हायरल व्हिडीओनुसार ही घटना 10 मे रोजी घडल्याचे दिसत आहे. मात्र, ट्विशाच्या कुटुंबीयांच्या मते सीसीटीव्ही सिस्टीममधील वेळेत आणि तारखेत मोठी चूक आहे. ही घटना 10 मेची नसून 12 मेची आहे. पुरावे मिटवण्यासाठी आणि पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी सासरच्या लोकांनी तारखेशी छेडछाड केल्याचा संशय कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे. याशिवाय, ट्विशाच्या व्हॉट्सॲप (WhatsApp) आणि इतर सोशल मीडिया चॅट्सवरून ती तीव्र दडपणाखाली आणि भीतीखाली वावरत असल्याचे स्पष्ट होत असल्याचा दावाही तिच्या माहेरच्यांनी केला आहे. पोलीस आणि फॉरेन्सिक रिपोर्टमध्येही काहीतरी गडबड असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. दुसरीकडे, ट्विशाची सासू आणि निवृत्त न्यायाधीश गिरीबाला सिंग यांनी मुलीच्या कुटुंबीयांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांनी ट्विशाच्या मानसिक स्थितीवर बोट ठेवत सांगितले की, “ट्विशा ही मानसिक आजाराने ग्रस्त होती आणि तिच्यावर मानसोपचारतज्ज्ञांकडून उपचार सुरू होते. तिला ‘सिजोफ्रेनिया’ (Schizophrenia) या गंभीर मानसिक आजाराची औषधं दिली जात होती. औषधं घेतल्यावर ती काही वेळ बरी असायची, पण नंतर पुन्हा तिची प्रकृती बिघडायची आणि तिचे हात थरथरायचे. ती गांजा ओढत असल्याची कबुली तिने स्वतः दिली होती. माझा मुलगा समर्थ हा एक सक्षम वकील असून त्याने कधीही कोणत्याही अंमली पदार्थांचे सेवन केलेले नाही.”
५ महिन्यांपूर्वीच झाले होते लग्न
ट्विशा शर्मा हिचा विवाह गेल्या वर्षी ९ डिसेंबर रोजी समर्थ सिंग याच्याशी झाला होता. परंतु, लग्नानंतर अवघ्या ५ महिन्यांतच तिच्या आयुष्याचा असा करुण अंत झाला. लग्नानंतर तिचे प्रचंड शारीरिक आणि मानसिक शोषण केले जात होते, असे तिच्या माहेरच्यांचे म्हणणे आहे. सध्या या हाय-प्रोफाइल प्रकरणात परिसरात तीव्र संतापाची लाट असून, पोलीस दोन्ही बाजूंचा सखोल अभ्यास करून पुढील तपास करत आहेत.