Maharashtra News LIVE: 26 नोव्हेंबरपासून मुंबईतील पाणीपुरवठ्यावर परिणाम; नागरिकांना पाणीसाठा करून ठेवण्याचं आवाहन
Maharashtra News LIVE: मुंबईतील पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने आता शहरातील पारंपरिक जलस्रोत असलेल्या विहिरींच्या पुनरुज्जीवनाचा निर्णय घेतला आहे. विहिरींमधील गाळ काढणे, स्वच्छता, दुरुस्ती आणि पंप बसविण्याची कामे या निधीतून केली जाणार आहेत.

LIVE NEWS & UPDATES
-
26 नोव्हेंबरपासून मुंबईतील पाणीपुरवठ्यावर परिणाम
26 नोव्हेंबरपासून मुंबईतील पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे. पवई उच्चस्तरीय जलाशय क्रमांक 1 ते सहार गावादरम्यान मुख्य जलवाहिन्यांवरील गळती दुरुस्तीचं काम हाती घेण्यात येणार आहे. 26 नोव्हेंबर सकाळी 9 ते 27 नोव्हेंबर सकाळी 9 वाजेपर्यंत 24 तास दुरुस्तीचं काम सुरू असेल. जी उत्तर, के दक्षिण, के उत्तर, एच पूर्व आणि एस विभागातील काही परिसरांत पाणीपुरवठा बंद असेल. के दक्षिण, एस आणि एन विभागातील काही परिसरांत कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. धारावी, माहीम, मरोळ, चकाला, जे. बी. नगर, सहार, वांद्रे पूर्व, खेरवाडी, विक्रोळी, कांजूरमार्ग, भांडुप आणि गोदरेज परिसराला परिणाम होणार आहे. दुरुस्तीनंतर पुढील तीन ते चार दिवस काही भागांत कमी दाबाने आणि गढूळ पाणी येण्याची शक्यता आहे. नागरिकांनी पाण्याचा साठा करून ठेवावा; पाणी गाळून आणि उकळून प्यावं, असं आवाहन पालिकेनं केलं आहे.
-
मिरा-भाईंदर महापालिकेतील महासभेच्या जेवणाच्या मेन्यूवरून नवा राजकीय वाद
मिरा-भाईंदर महापालिकेतील महासभेच्या जेवणाच्या मेन्यूवरून नवा राजकीय वाद निर्माण झाला आहे. महापालिकेच्या महासभेत गेल्या सहा महिन्यांपासून केवळ शाकाहारी जेवणाची व्यवस्था केली जात असल्याने शिवसेनेसह काँग्रेसच्या नगरसेवकांनी या निर्णयाला विरोध दर्शवला आहे. विशेष म्हणजे, गेल्या २५ वर्षांपासून महासभेत शाकाहारी आणि मांसाहारी अशा दोन्ही प्रकारच्या जेवणाची व्यवस्था केली जात होती. मात्र, अचानक केवळ शाकाहारी जेवण देण्याचा निर्णय घेण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. आगरी-कोळी समाजाचे मोठे वास्तव्य असलेल्या मिरा-भाईंदर शहरात मांसाहाराला अशा प्रकारे बाजूला का ठेवले जात आहे, असा सवाल विरोधकांकडून उपस्थित केला जात आहे. दुसरीकडे, जैन समाजाच्या एकगठ्ठा मतांचा विचार करून सत्ताधारी भाजपने हा निर्णय घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
-
-
मुंबईच्या कोस्टल रोडवरील केबल चोरांना आळा घालण्यासाठी पालिकेची नवी रणनीती
मुंबईच्या कोस्टल रोडवरील केबल चोरांना आळा घालण्यासाठी पालिकेनं नवी रणनीती आखली आहे. सीसीटीव्ही केबलच्या सुरक्षेसाठी पीव्हीसी पाइपऐवजी जीआय पाइप वापरण्याचा विचार केला जात आहे. कोस्टल रोडवर आतापर्यंत तब्बल 110 किलोमीटर केबल चोरीला गेले आहेत. केबल चोरीमुळे सुमारे 65 सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत. तांब्याच्या केबलऐवजी ॲल्युमिनियम वायरिंग करूनही चोरीच्या घटना सुरूच आहेत. त्यामुळे आता सहज न तुटणारे जीआय पाइप बसवण्याचा मुंबई महापालिकेचा प्रयत्न आहे. मात्र नवीन व्यवस्थेमुळे खर्च चार ते पाच पट वाढण्याची शक्यता आहे. सीसीटीव्ही बंद असल्याने अपघातातील बीएमडब्ल्यू कारचे फुटेज मिळवण्यात अडचण निर्माण झाली होती.
-
मुंबईतील विहिरींना नवसंजीवनी देण्यासाठी पालिकेचा प्रत्येकी विभागांना 30 लाखांचा निधी
मुंबईतील पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने आता शहरातील पारंपरिक जलस्रोत असलेल्या विहिरींच्या पुनरुज्जीवनाचा निर्णय घेतला आहे. विहिरींमधील गाळ काढणे, स्वच्छता, दुरुस्ती आणि पंप बसविण्याची कामं या निधीतून केली जाणार आहेत. प्रायोगिक तत्त्वावर प्रत्येक विभागातील पाच विहिरींची निवड करण्यात येणार असून, या उपक्रमासाठी पालिकेच्या तिजोरीवर सुमारे 7 कोटी रुपयांचा भार पडणार आहे. मुंबईची दररोजची पाण्याची गरज सुमारे 4 हजार 500 दशलक्ष लिटर असताना, सध्या धरणांमधून सुमारे 4 हजार 100 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जात आहे.
एल निनोच्या संभाव्य प्रभावामुळे आणि पावसाच्या अनिश्चिततेमुळे मुंबईत 10 टक्के पाणीकपात लागू करण्यात आली होती. अपेक्षित पाऊस न झाल्याने ही पाणीकपात अद्याप कायम आहे. त्यामुळे पाण्याचे पर्यायी स्रोत उपलब्ध करण्यासाठी महापालिकेकडून रेन वॉटर हार्वेस्टिंग, बोअरवेल आणि विहिरींच्या पुनरुज्जीवनावर भर दिला जात आहे. याच पार्श्वभूमीवर जलअभियंता विभागाने विहिरींच्या पुनरुज्जीवनासाठी प्रस्ताव तयार केला होता. आवश्यक बाबींची पूर्तता करून सुधारित प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर विभागांना प्रत्येकी 30 लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे.
26 नोव्हेंबरपासून मुंबई शहरातील काही भागांतील पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे. पवई उच्चस्तरीय जलाशय क्रमांक 1 ते सहार गावादरम्यान मुख्य जलवाहिन्यांवरील गळती दुरुस्तीचं काम मुंबई महापालिकेकडून हाती घेण्यात येणार आहे. यासाठी 26 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 वाजल्यापासून ते 27 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 वाजेपर्यंत सलग 24 तास दुरुस्तीचे काम सुरू राहणार आहे. या कालावधीत जी उत्तर, के दक्षिण, के उत्तर, एच पूर्व आणि एस विभागातील काही परिसरांचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे, तर के दक्षिण, एस आणि एन विभागातील काही भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. यासह इतरही महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी हा ब्लॉग फॉलो करा.
Published On - Nov 24,2026 8:06 AM
