प्रश्नपत्रिकेत घोळ झाल्याचा आरोप, देशात आणखी एक महत्त्वाची परीक्षा पुन्हा होणार, मोठी अपडेट आली समोर

एनटीएच्या प्रश्नपत्रिकेत घोळ झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर देशात ही महत्त्वाची परीक्षा पुन्हा होणार असल्याचे समोर आलं आहे.

प्रश्नपत्रिकेत घोळ झाल्याचा आरोप, देशात आणखी एक महत्त्वाची परीक्षा पुन्हा होणार, मोठी अपडेट आली समोर
nta
Image Credit source: tv9
| Updated on: Aug 17, 2026 | 10:36 AM

राष्ट्रीय चाचणी संस्थेने (NTA) यूजीसी-नेट 2026 इंग्रजी, कॉमर्स आणि समाजशास्त्र या तीन विषयांच्या परीक्षा पुन्हा घेण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. या विषयांच्या प्रशपत्रिकेत घोळ झाल्याच्या आरोपानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. या परीक्षेचे वेळापत्रक देखील लवकरच समोर येणार असल्याचे सांगण्यात आलं आहे.

एनटीएने देशभरातील विविध केंद्रात 22 जून ते 30 जून 2026 या कालावधीत एकूण 87 विषयांमध्ये युजीसी-नेट 2026 परीक्षेचे आयोजन करण्यात आलं होतं. देशभरातील डिग्री कॉलेज आणि विद्यापीठांमध्ये ज्युनियर रिसर्च फेलोशिप, सहाय्यक प्राध्यापक पदासाठी पात्रता, पीएचडी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासासाठी ही परीक्षा घेण्यात येते. परंतु ही परीक्षा झाल्यानंतर उमेदवारांनी इंग्रजी, कॉमर्स, समाजशास्त्राच्या विषयांतील प्रश्नपत्रिकांमध्ये अनेक चुका काढल्या. तसेच भाषेसंदर्भातही त्रुटी काढल्या.

Loading...

एनटीएकडून अधिकृत पत्रक जारी 

उमेदवारांनी संताप व्यक्त केल्यानंतर एनटीएने अधिकृत वेबसाईटवर 84 विषयांची तात्पुरती उत्तरतालिका प्रसिद्ध केल्यात. परंतु इंग्रजी, कॉमर्स आणि समाजशास्त्र विषयांच्या उमेदवारांसाठी कोणतीही उत्तरतालिका प्रसिद्ध केली नाही. त्यानंतर एनटीएने एक अधिकृत पत्रक जारी केलं. त्यात म्हटलं की, उमेदवारांच्या तक्रारीची दखल घेऊन विद्यार्थ्यांच्या हिताचे रक्षण करण्याच्या उद्देशाने तीन विषयांची परीक्षा रद्द (Exam Cancelled) करून पुन्हा घेण्याचा निर्णय घेतला आहे. तत्पूर्वी, उत्तरतालिका प्रसिद्ध करण्यासहित एनटीएने उमेदवारांना आक्षेप नोंदवण्याची देखील संधी दिली आहे. मात्र, यासाठी उमेदवारांना 200 रुपयांची प्रक्रिया शुल्क ऑनलाइन (Online) भरावी लागणार आहे. एनटीएने आक्षेप नोंदवण्यासाठी 16 ते 18 ऑगस्टपर्यंत ही मुदत निश्चित केली आहे.

विद्यार्थ्यांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, एनटीएचा सल्ला 

दरम्यान, एनटीएच्या (NTA) निर्णयाने हजारो उमेदवारांना (Candidate) आणखी एक संधी मिळणार आहे. एनटीए लवकरच या तिन्ही विषयांवर नव्याने परिक्षांच्या तारखा, वेळापत्रक आणि अॅडमिट कार्ड जारी करण्यासंबंधी माहिती अधिकृत पोर्टल ugcnet.nta.nic.in वर जाहीर करणार आहे. तसेच उमेदवारांनी वेळापत्रकासाठी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि केवळ अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या माहितीवरच अवलंबून राहावे, असा सल्लाही देण्यात आला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us