
अहमदाबाद विमान अपघाताची घटना ताजी असताना आता उत्तर प्रदेशातील उन्नावमध्ये एक मोठा रेल्वे अपघात टळला आहे. शेळ्या चारत असलेल्या एका 16 वर्षांच्या तरुणाच्या हुशारीमुळे शेकडो लोकांचा जीव वाचला आहे. उन्नावमधील सफीपूर रेल्वे स्थानकाजवळ रुळाखालील माती दबल्यामुळे रूळ खचला होता. तसेच रुळांना भेगा पडल्या होत्या. यामुळे रेल्वेचा अपघात होण्याची शक्यता होती. मात्र 16 वर्षीय श्रीजन मिश्राच्या सतर्कतेमुळे हा अपघात टळला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
समोर आलेल्या माहितीनुसार, उन्नावमधील सफीपूर रेल्वे स्थानकाजवळ ट्रॅक खचला होता, त्याचवेळी कानपूर-बलामाऊ पॅसेंजर ट्रेन सफीपूर स्थानकातून निघाली, श्रीजन मिश्राला हा ट्रेन भरधाव वेगाने येत असल्याचे दिसले. त्यावेळी सृजनने बुद्धीचा वापर करत आपला लाल रंगाचा टी-शर्ट काढला आणि तो फिरवू लागला. लाल रंगाचे कापड पाहून लोको पायलटने ट्रेन थांबवली त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.
ट्रेन थांबल्यानंतर रेल्वे रुळाबाबत रेल्वे प्रशासनाला देण्यात आली. त्यानंतर रेल्वे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी ट्रॅक दुरुस्त केला आणि त्यानंतर ट्रेन पुढे गेली. या ट्रेनमधून शेकडो लोक प्रवास करत होते. ट्रेन थांबल्यामुळे अपघात टळला. यामुळे संपूर्ण परिसरात श्रीजनचे कौतुक केले जात आहे. रेल्वे अधिकाऱ्यांनीही त्याच्या शौर्याचे कौतुक केले आहे.
श्रीजन कोण आहे?
समोर आलेल्या माहितीनुसार, श्रीजन हा उन्नावमधील दाबौली गावचा रहिवासी आहे. तो 16 वर्षांचा आहे. त्याच्या घरची परिस्थिती गरीब आहे. तो अनेकदा त्याच्या शेळ्या घेऊन रेल्वे रुळांकडे जात असे. मात्र यावेळी त्याने ट्रॅक खचलेला पाहिला आणि हुशारीने ट्रेनमधील शेकडो लोकांचे प्राण वाचवले.
प्रवाशांनी काय म्हटले?
कानपूर-बलमाऊ पॅसेंजर ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी सांगितले की, अचानक ट्रेनला ब्रेक लावण्यात आला त्यामुळे सर्वजण घाबरले होते. त्यानंतर लोको पायलट आणि ट्रेन गार्ड खाली उतरले आणि त्यांना ट्रॅक खचला असल्याचे दिसले. त्यांनी ताबडतोब रेल्वेला माहिती दिली. रेल्वेची टीम घटनास्थळी पोहोचली व ट्रॅक दुरुस्त करण्यात आला आणि त्यानंतर ट्रेन तेथून रवाना झाली.