डोनाल्ड ट्रम्प यांचं पुन्हा भारताबाबत खळबळजनक वक्तव्य, मोदींना फोन केला अन् नंतर लगेचच मोठा दावा

डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन करून दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र त्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा भारताबाबत खळबळजनक दावा केला आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांचं पुन्हा भारताबाबत खळबळजनक वक्तव्य, मोदींना फोन केला अन् नंतर लगेचच मोठा दावा
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 22, 2025 | 6:41 PM

भारत रशियाकडून तेलाची खरेदी करतो म्हणून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वस्तूंवर 50 टक्के टॅरिफ लावला आहे, भारत रशियाकडून तेलाची खरेदी करतो आणि त्या पैशांचा उपयोग रशिया हा युक्रेनविरोधातील युद्धात फंड म्हणून करत असल्याचा आरोप देखील अनेकदा ट्रम्प यांच्याकडून करण्यात आला आहे. भारतानं रशियाकडून तेलाची खरेदी करू नये, असं देखील त्यांनी अनेकदा म्हटलं आहे. आता एक मोठी बातमी समोर आली आहे.

ती म्हणजे अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी रात्री फोन करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत, त्यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये देखील दिवे लावून दिवाळीचा उत्सव साजरा केला. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवरून संवाद साधल्यानंतर आता पु्न्हा एकदा डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठा दावा केला आहे. मला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं की ते आता रशियाकडून तेलाची जास्त खरेदी करणार नाहीत, असा दावा ट्रम्प यांनी केला आहे.

नेमकं काय म्हणाले ट्रम्प

मी भारताच्या लोकांवर प्रेम करतो, भारत आणि अमेरिकेदरम्यान महत्त्वाच्या व्यापारी करारावर चर्चा सुरू आहे. मी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बोललो, आमच्यामध्ये खूप चांगले संबंध आहेत, ते आता रशियाकडून जास्त तेलाची खरेदी करणार नाहीत, असा दावा ट्रम्प यांनी केला आहे. पुढे बोलताना ट्रम्प यांनी असं देखील म्हटलं आहे की, माझ्या प्रमाणेच त्यांना देखील युक्रेन आणि रशियामधील झालेला युद्धविराम पहायचा आहे, त्यामुळे ते आता रशियाकडून जास्त तेलाची खरेदी करणार नाहीत, त्यांनी रशियाकडून सुरू असलेल्या कच्च्या तेलाच्या खरेदीमध्ये मोठ्या प्रमाणात कपात केली आहे, आणि ही कपात वाढतच आहे, असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे.

आम्ही व्यापारावर चर्चा केली आहे, मी काही दिवसांपूर्वी बोललो होतो, की भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणतंही युद्ध झाल नाही पाहिजे, दोन्ही देशांसोबत अमेरिकेचा व्यापार सुरू आहे, त्यामुळेच मी हे बोलू शकलो, आमचं भारत आणि पाकिस्तासोबत कोणत्याही प्रकारचं शत्रूत्व नाही, असंही यावेळी ट्रम्प यांनी म्हटलं आहे. मोदी हे एक महान व्यक्ती आहेत, आणि गेल्या काही वर्षांपासून ते माझे एक चांगले मित्र सुद्धा झाले आहेत, असंही यावेळी ट्रम्प यांनी म्हटलं आहे.