शाहरुख, अजय देवगण अडचणीत येताच विमल इलायचीने उचललं मोठं पाऊल; FDA विरोधात थेट कोर्टात लढाई!

विमल इलायची निर्मिती करणाऱ्या पीबी ॲग्रो कंपनीने महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (FDA) अभिनेते शाहरुख खान, अजय देवगण, टायगर श्रॉफ यांना बजावलेल्या नोटिसीला दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे.

शाहरुख, अजय देवगण अडचणीत येताच विमल इलायचीने उचललं मोठं पाऊल; FDA विरोधात थेट कोर्टात लढाई!
Vimal Elaichi moves to Delhi High Court
| Updated on: Sep 07, 2026 | 5:24 PM

विमल इलायचीची निर्मिती करणाऱ्या पीबी ॲग्रो कंपनीने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (FDA) अभिनेता शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. आता पीबी ॲग्रो कंपनीने न्यायालयात जात याच नोटिसींनाआव्हान दिलं आहे. विमल इलायचीच्या जाहिरातींच्या माध्यमातून महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या विमल पान मसाल्याची अप्रत्यक्ष किंवा सरोगेट जाहिरात केली जात असल्याचा आरोप महाराष्ट्र FDA ने केला होता. मात्र, कंपनीने हा आरोप स्पष्टपणे फेटाळून लावला आहे. एफडीएने जारी केलेल्या नोटीस रद्द करण्यासाठी कंपनीने दिल्ली हायकोर्टाचा दरवाजा ठोठावला. या प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती स्वर्णा कांता शर्मा यांनी महत्त्वाच्या प्राथमिक मुद्द्यावर निर्णय राखून ठेवला आहे.

FDA ने शाहरुख खान, अजय देवगण, टायगर श्रॉफकडे काय केली मागणी ?

रिपोर्ट्सनुसार, विमल इलायची आणि महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला पान मसाला ही दोन स्वतंत्र उत्पादनं आहेत, हे सिद्ध करणारी कागदपत्रं सादर करा, असं महाराष्ट्र FDA ने विमल इलायचीच्या जाहिरातींमध्ये सहभागी असलेले कंपनीचे ब्रँड अँम्बॅसेडर शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांना सांगितलं होतं. याशिवाय, संबंधित जाहिरात मोहीम तात्काळ थांबवावी आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असलेलं संबंधित प्रचारात्मक साहित्य हटवावं, अशी मागणीही FDA ने केली होती.

महाराष्ट्र FDA ने 11 ऑगस्ट 2026 रोजी  नोटिस जारी केली, त्याविरोधात पीबी ॲग्रोने आता दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.  या प्रकरणातील पुढील निर्णय दिल्ली उच्च न्यायालयाला या याचिकेवर सुनावणी करण्याचा अधिकार आहे की नाही, या प्राथमिक प्रश्नावर अवलंबून आहे.

काय आहे प्रकरण ?

महाराष्ट्र FDAने विमल इलायचीच्या जाहिरातीची गंभीर दखल घेत तिच्या स्वरूपाबाबत चौकशी सुरू केली. ‘विमल’ हा ब्रँड प्रामुख्याने पान मसाल्याशी जोडला जात असल्याने, त्याच नावाने करण्यात येणाऱ्या इलायचीच्या जाहिरातीमुळे ग्राहकांना पान मसाल्याच्या ब्रँडची आठवण येऊ शकते, असा युक्तिवाद FDAने केला होता. त्यामुळे ही जाहिरात सरोगेट किंवा अप्रत्यक्ष जाहिरात ठरते का, याची चौकशी FDAकडून सुरू करण्यात आली.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us