Violence In Bengal : भाजपकडून हिंसाचाराचे जुने व्हिडीओ पसरवण्याचं काम, ममता बॅनर्जी संतापल्या

| Updated on: May 05, 2021 | 5:20 PM

तृणमूल काँग्रेसच्या गुंडांकडून भाजप कार्यकर्त्यांची हत्या, त्यांची घरं लुटणं, घरांना आग लावणं, भाजप महिला कार्यकर्त्यांवर बलात्कार करण्यात आल्याचा गंभीर आरोप भाजप नेत्यांनी केलाय. त्यावर ममता बॅनर्जी चांगल्याच संतापल्या आहेत.

Violence In Bengal : भाजपकडून हिंसाचाराचे जुने व्हिडीओ पसरवण्याचं काम, ममता बॅनर्जी संतापल्या
Mamata banerjee
Follow us on

कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजपला धोबीपछाड देत ममता बॅनर्जी यांनी सलग तिसऱ्यांचा सत्ता मिळवली आहे. मात्र, विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर पश्चिम बंगालमध्ये हिंसाचाराच्या मोठ्या घटना समोर येत आहेत. तृणमूल काँग्रेसच्या गुंडांकडून भाजप कार्यकर्त्यांची हत्या, त्यांची घरं लुटणं, घरांना आग लावणं, भाजप महिला कार्यकर्त्यांवर बलात्कार करण्यात आल्याचा गंभीर आरोप भाजप नेत्यांनी केलाय. त्यावर आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी चांगल्याच संतापल्या आहेत. (CM Mamata Banerjee blames BJP for violence in West Bengal)

हिंसाचाराचे जुने व्हिडीओ पसरवण्याचं काम भाजपकडून सुरु असल्याचा गंभीर आरोप ममता बॅनर्जी यांनी केलाय. ‘अशा पद्धतीच्या हिंसाचाराच्या घटना सहन केल्या जाणार नाहीत. जिथे भाजपचे उमेदवार जिंकले, तिथे अधिक गोंधल माजला आहे. भाजप आता जुने व्हिडीओ दाखवून हिंसाचाराच्या घटनांचा बनाव करत आहे. सर्व राजकीय पक्षांना विनंती आहे की, असे प्रकार थांबवा. निवडणूक काळात तुम्ही सर्वांनी बरंच काही केलंय. बंगाल ही एकता असलेली भूमी आहे’, असं ट्वीट ममता बॅनर्जी यांनी केलंय.

भाजपाध्यक्ष बंगालमध्ये दाखल

बंगाल हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा मंगळवारी कोलकाता इथं पोहोचले. हिंसाचाराबाबत चिंता व्यक्त करताना भाजप लोकशाही पद्धतीनेच तृणमूल काँग्रेसच्या अराजकतेचा सामना करेल आणि भाजप कार्यकर्त्यांचा मृत्यू व्यर्थ जाणार नाही, अशा शब्दात त्यांनी हिंसाचाराचा निषेध व्यक्त केलाय. नड्डा मंगळवारी दुपारी कोलकाता इथं पोहोचले. त्यानंतर त्यांनी भाजपचे केंद्रीय प्रभारी कैलास विजयवर्गीय, प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष, केंद्रीय सह प्रभारी शिवप्रकाश, माजी अध्यक्ष राहुल सिन्हा आणि राष्ट्रीय उपाध्यक्ष मुकुल रॉयसह राज्यातील अन्य नेत्यांसोबत चर्चा केली. त्यानंतर जे. पी. नड्डा यांनी मृत भाजप कार्यकर्त्यांच्या कुटुंबियांची भेट घेत त्यांचं सांत्वन केलं.

संबंधित बातम्या : 

Violence In Bengal : निवडणूक निकालानंतर पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार, भाजप कार्यकर्त्यांची हत्या, महाराष्ट्रात निदर्शनं

West Bengal Result : पश्चिम बंगालमध्ये डावे आणि काँग्रेस स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच शुन्यावर!

CM Mamata Banerjee blames BJP for violence in West Bengal