West Bengal CM 2021: ममता बॅनर्जी यांची विधीमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड, 5 मे रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ

| Updated on: May 03, 2021 | 6:45 PM

तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी सलग तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार आहेत. ममता बॅनर्जी यांची विधीमंडळ पक्षाच्या नेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

West Bengal CM 2021: ममता बॅनर्जी यांची विधीमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड, 5 मे रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ
ममता बॅनर्जी 5 मे रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार
Follow us on

कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत एकहाती सत्ता मिळवल्यानंतर तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी सलग तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार आहेत. ममता बॅनर्जी यांची विधीमंडळ पक्षाच्या नेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. 5 मे रोजी राजभवनात त्यांचा शपथविधी होणार असल्याची माहिती देण्यात आलीय. तसंच 6 मे रोजी विधानसभाचे प्रोटेम अध्यक्ष बिमान बॅनर्जी हे सर्व पक्षाच्या आमदारांना शपथ देतील. त्याचबरोबर बिमान बॅनर्जी यांचीच पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्षपदी नियुक्ती केली जाणार आहे. (Mamata Banerjee oath taking ceremony as West Bengal Chief Minister)

ममता बॅनर्जी आज संध्याकाळी राज्यपाल जगदीप धनकर यांची भेट घेणार आहेत. त्यावेळी पक्षाकडून घेण्यात आलेल्या निर्णयाची माहिती त्या राज्यपालांना देणार आहेत. विधानसभा निवडणुकीत भाजपला धूळ चारत दमदार विजय मिळवल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी पक्षाच्या नवनिर्वाचित आमदारांची तपसिया इथल्या पक्षाच्या कार्यालयात आज बैठक घेतली. या बैठकीला टीएमसीचे खासदार आणि ममतांचे पुतणे अभिषेक बॅनर्जी आणि निवडणुकीचे रणनितीकार प्रशांत किशोर उपस्थित होते.

ममता बॅनर्जींना एकहाती बहुमत

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसनं 292 पैकी तब्बल 213 जागांवर विजय संपादित करत एकहाती बहुमत मिळवलं आहे. 205 जागा जिंकण्याचा दावा करणाऱ्या भाजपला मात्र 77 जागांवर समाधान मानावं लागलं आहे. दरम्यान, ममता बॅनर्जी यांनी आज नवनियुक्त आमदारांसोबत घेतलेल्या बैठकीत सर्वांना कोरोना नियमांचं पालन करण्याचं आवाहन केलं आहे. त्याचबरोबर कोरोना नियमाबाबत लोकांचमध्ये जागृती निर्माण करणे आणि स्थानिकांची मदत करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.

2024 साठी एकजूट व्हा, विरोधी पक्षांना आवाहन

दरम्यान, निवडणूक निकालानंतर विविध भागात हिंसाचाराच्या मोठ्या घटना समोर येत आहेत. अशावेळी बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी शांततेचं आवाहन केलं आहे. त्याचबरोबर कोरोनाशी लढाई ही आपली प्राथमिकता असल्याचंही त्यांनी म्हटलंय. विजयानंतर उद्धव ठाकरे, नवीन पटनायक, रजनीकांत, अखिलेश यादव अरविंद केजरीवाल, कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी अभिनंदनासाठी फोन केले. मात्र, पंतप्रधान मोदींनी अद्याप फोन केला नसल्याचं ममता बॅनर्जी म्हणाल्या.

कोरोनाचा प्रादुर्भाव शमल्यानंतर आम्ही सर्व मिळून काम करु. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय आणि लोकांच्या मुद्द्यांवर मिळून काम करु इच्छित आहोत. पण एका हाताने टाळी कधी वाजत नाही, अशा शब्दात ममता बॅनर्जी यांनी सर्व विरोधी पक्षाच्या नेत्यांना आवाहन केलं आहे. तसंच हे वक्तव्य करुन त्यांनी भाजपविरोधात रणशिंग फुंकल्याचं पाहायला मिळत आहे.

संबंधित बातम्या :

बंगालमधून डावे ‘लेफ्ट’ का झाले?, पराभवाची मुख्य कारणे; वाचा सविस्तर

आसाम, बंगालमध्ये पराभव, केरळही गेले; राहुल गांधी, प्रियांका समोरील आव्हाने वाढली?

Mamata Banerjee oath taking ceremony as West Bengal Chief Minister