Kolkata Election Result 2026 : भाजपकडून लढणाऱ्या महाभारतातल्या द्रौपदीची काय स्थिती? पुढे की मागे? जाणून घ्या

Kolkata Election Result 2026: पाच राज्यांतील 824 विधानसभा जागांसाठी झालेल्या मतदानामध्ये सर्वाधिक लक्षवेधी पश्चिम बंगालची निवडणूक ठरतेय. सोनारपूर दक्षिण मतदारसंघातून भाजपच्या रुपा गांगुली आघाडीवर आहेत.

Kolkata Election Result 2026 : भाजपकडून लढणाऱ्या महाभारतातल्या द्रौपदीची काय स्थिती? पुढे की मागे? जाणून घ्या
रुपा गांगुली, लवली मैत्रा
Image Credit source: Instagram
| Updated on: May 04, 2026 | 10:47 AM

पश्चिम बंगाल, आसाम, तमिळनाडू, केरळ आणि पुद्दुचेरी इथल्या विधानसभा निवडणुकांच्या निकालांकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून आहे. हे निकाल केवळ या राज्यांचं राजकीय भवितव्य निश्चित करणार नसून देशाच्या राजकारणावरही दूरगामी परिणाम घडवून आणण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला सत्ता राखण्यात यश आलं तर ममता बॅनर्जी चौथ्यांदा मुख्यमंत्री होतील. तृणमूल काँग्रेसचा पराभव करून भाजपला बहुमत मिळालं तर केंद्रातील सत्ताधारी पक्षासाठी पश्चिम बंगालमधील सत्ता पहिल्यांदा काबीज करणं हा अभूतपूर्व विजय ठरेल. आतापर्यंत हाती आलेल्या कलांनुसार पश्चिम बंगालमध्ये टीएमसी 128 जागांवर आणि भाजप 153 जागांवर आघाडीवर आहे. सोनारपूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात भाजपने ‘महाभारत’ फेम अभिनेत्री रुपा गांगुली यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवलं आहे.

रुपा यांनी ‘महाभारत’ या मालिकेत द्रौपदीची भूमिका साकारली होती. तर दुसरीकडे टीएमसीने अभिनेत्री अरुंधती (लवली) मैत्रा यांना तिकिट दिलं होतं. सीपीआयने परमिता दासगुप्ता आणि काँग्रेसने सुब्रत दत्ता यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवलं आहे. आतापर्यंत हाती आलेल्या कलांनुसार, भाजपच्या रुपा गांगुली आघाडीवर आहे, तर टीएमसीच्या लवली मैत्री पिछाडीवर आहेत. सोनारपूर दक्षिण मतदारसंघात भाजप आणि टीएमसी यांच्यात कांटे की टक्कर पहायला मिळतेय.

2016 मध्ये पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या ठीक आधी रुपा यांनी राजकारणात आपलं नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला होता. त्यासाठी 2015 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांनी भाजपच्या तिकिटावर हावडा उत्तर मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली होती, परंतु ममता बॅनर्जी यांच्यासमोर त्या टिकू शकल्या नव्हत्या. टीएमसीच्या लक्ष्मी रतन शुक्ला यांच्याकडून त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर भाजपने रुपा यांना ऑक्टोबर 2016 मध्ये थेट राज्यसभेवर निवडून दिलं होतं. 2022 मध्ये त्यांचा राज्यसभा सदस्य म्हणून कार्यकाळ पूर्ण झाला. त्यानंतर आता विधानसभा निवडणुकीत भाजपने त्यांना सोनारपूर दक्षिणमधून तिकिट दिलं.

पश्चिम बंगालच्या निवडणुकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची राजकीय प्रतिष्ठाही पणाला लागली होती. निवडणूक प्रचार आणि दोन टप्प्यांमधील मतदानामध्ये पश्चिम बंगाल हे राजकीय तणावाचं केंद्रस्थान बनलं होतं.

Follow Us