
12 जून रोजी अहमदाबादमध्ये मोठी विमान दुर्घटना घडली. एअर इंडियाच्या बोइंग 787-8 ड्रीमलाइनर विमानाने अहमदाबादमधून लंडनला जाण्यासाठी उड्डान केलं. मात्र त्यानंतर अवघ्या काही क्षणातच हे विमान एका मेडिकल कॉलेजच्या इमारतीवर कोसळलं. या घटनेमध्ये दोन इमारतीचं प्रचंड नुकसान झालं. शेकडो लोकांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर 56 वर्षीय राजू पटेल यांनी सर्वात आधी घटनास्थळी धाव घेतली. ते व्यावसायानं बांधकाम व्यावसायिक आहेत.
त्यांनी या घटनेबाबत बोलताना सांगितलं की सुरुवातीचे पंधरा ते वीस मिनिटं अपघातस्थळी पोहोचणं अत्यंत कठिण काम होतं. मात्र आम्ही हार मानली नाही. या अपघातामध्ये किती नुकसान झालं? याचा सुरुवातीला आम्हाला काहीच अंदाज येत नव्हता. घटनास्थळी स्टेचर नव्हतं, आम्ही अपघातग्रस्त लोकांना साडी आणि चादरीच्या मदतीने उचलण्याचा प्रयत्न केला. आमच्याकडे जे काही साधनं होती, त्याचा उपयोग करून आम्ही जखमी लोकांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला.
घटनास्थळी नेमकं काय सापडलं?
पटेल यांनी याबाबत एका वृत्तवाहिनीला माहिती देताना सांगितलं की, आम्ही जेव्हा तिथे पोहोचलो, तेव्हा आम्हाला तिथे चारही बाजुला जळालेल्या बॅगा आणि तुटलेलं सामान आढळून आलं. आमच्या टीमला घटनास्थळी सत्तर तोळे सोन्याचे दागिने 80 हजार रुपयांची रोकड आणि अनेक पासपोर्ट तसेच एक भगवद् गीतेचं पुस्तक सापडलं, आम्ही या सर्व वस्तू पोलिसांकडे जमा केल्या, अशी माहिती यावेळी पटेल यांनी दिली.
पुढे बोलताना ते म्हणाले की, जोपर्यंत सरकारची मदत पोहोचत नाही, तोपर्यंत आम्ही घटनास्थळी मदतकार्य करत होतो. मिळेल त्या साधनाने लोकांचा जीव वाचवण्याचा आमचा प्रयत्न होता.
अपघात नेमका कसा घडला?
एअर इंडियाच्या विमानानं लंडनला जाण्यासाठी अहमदाबादवरून उड्डाण केलं. मात्र उड्डाणाच्या अवघ्या काही सेंकदातच हे विमान प्रचंड वेगानं खाली आलं. त्यानंतर ते एका मेडिकल कॉलेजच्या इमारतीवर आदळं, जेव्हा हे विमान मेडिकल कॉलेजच्या इमारतीवर आदळलं, तेव्हा तेथील मेसमध्ये विद्यार्थी जेवण करत होते. या अपघातामध्ये प्रचंड प्रमाणात जीवितहानी झाली, या विमानातील केवळ एका प्रवाशाचा जीव वाचला.