
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्ष समारंभामध्ये बोलताना सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटलं की, जिथे दुःख निर्माण होतं तिथे धर्म नसतो. दुसऱ्या धर्माची निंदा करणे हा धर्म नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा जेवढा विरोध झाला तेवढा विरोध इतर कोणाचाच झाला नाही.संघाबद्दल सत्य आणि तथ्याला धरून माहिती देणं हाच या व्याख्यान मालेचा उद्देश आहे.
पुढे बोलताना भागवत यांनी म्हटलं की, संघात कधीच कोणाला काही मिळत नाही, उलट तुमच्याकडे जे आहे ते देखील चाललं जातं. स्वयंसेवक त्यांचं काम यासाठी करतात की त्यांना त्यांच्या कामामध्ये आनंद वाटतो. आपण जगाच्या कल्याणासाठी काम करत आहोत, या गोष्टीमधून त्यांना प्रेरणा मिळते, असंही यावेळी भागवत यांनी म्हटलं आहे.
‘आरएसएस हे संपूर्ण हिंदू समाजाचं संघटन आहे’
संघ हा हिंदू राष्ट्राच्या जीवन ध्येयाचा विकास आहे. 1925 च्या विजयादशमीला संघाची सुरुवात करताना डॉ. हेडगेवार यांनी म्हटलं होतं की, ही संपूर्ण हिंदू समाजाची संघटना आहे. ज्याला हिंदू हे नाव वापरायचे असेल, त्याला देशाप्रती जबाबदार राहावे लागेल. शुद्ध सात्त्विक प्रेम हाच संघ आहे, हाच संघाच्या कामाचा आधार आहे, असं भागवत यांनी म्हटलं आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की सत्य आणि प्रेम हेच हिंदू धर्म आहे. ते वेगवेगळे दिसतात, पण सर्व एक आहे. जग सौद्यांवर नाही तर आत्मीयतेवर चालते. मानवी संबंध हे करार आणि व्यवहारांवर अवलंबून नसून ते आत्मीयतेवर आधारित असले पाहिजेत. ध्येयासाठी समर्पित असणे हाच संघाच्या कार्याचा आधार आहे, उपभोगाच्या मागे धावणे जगाला विनाशाच्या उंबरठ्यावर आणते, जसे आजकाल सर्वत्र घडताना दिसत आहे.
जर तुम्हाला अनुकूल वातावरण मिळालं तर तुम्ही आरामदायी बनू नका, आराम करू नका, सतत चालत राहा. मैत्री, उपेक्षा, आनंद, करुणा याच्या आधारावर माणसानं सतत चालत राहावं. पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धानंतर आता जगात तिसऱ्या महायुद्धासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे, यावर फक्त धर्म संतुलन आणि भारतीय दृष्टीकोणातूनच उपाय सापडू शकतो, असं भागवत यांनी म्हटलं आहे.