
भारताचा शेवटचा रस्ता कोणता? अनेक जण म्हणतील अरे, असा विचार तर आम्ही कधीच केला नव्हता. भारतात रस्त्यांचं मजबूत जाळं तयार झाले आहे. आता तर ग्रीन रोड, समृद्धी महामार्ग, वेगवेगळे कॉरिडोअर भारताला पूर्व-पश्चिम आणि उत्तर-दक्षिण असे जोडत आहेत. तर भारताचा हा अखेरचा रस्ता थेट धनुषकोडीपर्यंत जातो. धनुषकोडी हे ठिकाण तामिळनाडू राज्यातील रामनाथपूरम या जिल्ह्यात आहे. या जिल्ह्याच्या दक्षिण-पूर्व किनाऱ्यावर हे शहर वसलेले आहे. हा रस्ता अरिचल मुनाई येथे जाऊन संपतो. थांबतो. त्यापुढे रस्ता नाही. हा भारतीय जमिनीवरील अखेरचा बिंदू आहे. त्यानंतर समुद्रीमार्ग सुरु होतो. येथून हिंद महासागरातून श्रीलंका अगदी
18–20 किलोमीटर अंतरावर आहे.
धनुष्यकोडीचा इतिहास आणि सांस्कृतिक महत्त्व काय?
धनुष्यकोडीचा उल्लेख रामायणात येतो. असं मानल्या जाते की भगवान श्रीराम आणि त्यांची सेना, लष्कर हे श्रीलंकेत जाण्यासाठी येथेच पोहचले. येथूनच रामसेतू (Ram Setu-Adam’s Bridge) तयार करण्यात आला. धनुष्यकोडी म्हणजे धनुष्याचे टोक. या नावाला किती ऐतिहासिक आणि पवित्र संदर्भ आहे हे तुम्हाला नावातूनच लक्षात आले असेल.
धनुष्यकोडी एकदम खास शहर
1964 पूर्वी धनुष्यकोडी हे एक छोटे पण दळणवळणाचे मुख्य शहर होते. येथे रेल्वे स्टेशन, टपाल घर, बंदर आणि इतर अनेक सुविधा होत्या. 1964 मध्ये येथे चक्रीवादळ घोंगावले. त्याला रामेश्वरम चक्रीवादळ म्हणतात. त्याने सगळं काही उद्धवस्त केलं. यानंतर धनुषकोडी जाणारी रेल्वे बंद करण्यात आली. आज NH 87 चा प्रगत, उन्नत मार्ग हा रामेश्वरमला धनुषकोडीशी जोडतो. हाच रस्ता पुढे अरिचल मुनाई येथे जाऊन समाप्त होतो. या शेवटच्या रस्त्याच्या एका बाजूला बंगालचा उपसागर तर दुसऱ्या बाजूला हिंद महासागर अंथाग पसरलेला आहे. हे एक विलोभनिय दृश्य आहे, जे तुमच्या मनाचा ठाव घेते.
धनुषकोडीपर्यंत पोहचणार कसं?
रामेश्वरम ते धनुषकोडीपर्यंत रस्त्याने जाता येते. हे अंतर जवळपास 20 किलोमीटर इतके आहे. हा रस्ता खासगी आणि सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला आहे. हा परिसर त्याच्या सौंदर्य स्थळांनी मन आकर्षून घेतो. भारत आणि श्रीलंकेतील अंतरही अगदी काही किलोमीटर असल्याने याठिकाणी पर्यटकांची नेहमी गर्दी असते. भारताच्या या शेवटच्या रस्त्याची मुशाफिरी एकदा कराच. तेव्हा त्याचे महत्त्व अधोरेखित होईल.