
दुबई एअर शो मध्ये हवाई कसरती दाखवताना तेजस फायटर जेट कोसळलं. शुक्रवारी दुपारी ही दुर्घटना घडली. या अपघातात इंडियन एअर फोर्सचे पायलट विंग कमांडर नमांश स्याल यांचा मृत्यू झाला. ते तेजस LCA MK-1 विमानातून चित्तथरारक हवाई कौशल्य दाखवत होते. तेजस हे स्वदेशी बनावटीचं फायटर विमान आहे. HAL ने या विमानाची निर्मिती केली. तेजसचा दुबईच्या एअर शो मध्ये झालेला अपघात हा भारतासाठी मोठा धक्का आहे. काल एअर शो चा शेवटचा दिवस होता. कमी उंचीवर उड्डाण करताना तेजसचं हवाई कौशल्य दाखवत असताना त्यांचं विमान कोसळलं. मूळचे हिमाचल प्रदेशचे असलेले नमांश स्याल हे 37 वर्षांचे होते.
“दुबई एअर शो मध्ये हवाई कौशल्य दाखवताना IAF च्या तेजस विमानाचा अपघात झाला. गंभीर दुखापतींमुळे वैमानिकाचा मृत्यू झाला. एका आयुष्याच नुकसान झाल्याचं आयएएफला खूप दु:ख आहे. या कठीण काळात आम्ही वैमानिकाच्या कुटुंबासोबत आहोत. या अपघाताचं कारण शोधण्यासाठी चौकशीचे आदेश दिले आहेत” असं इंडियन एअर फोर्सने आपल्या स्टेटमेंटमध्ये म्हटलं आहे. तेजस फायटर विमानाचा इंडियन एअर फोर्समध्ये 2016 साली समावेश झाला. त्यानंतर झालेला विमान कोसळण्याचा हा दुसरा अपघात आहे.
कोण होते नमांश स्याल?
विंग कमांडर नमांश स्याल हे हिमाचल प्रदेशच्या कांगडा जिल्ह्याचे निवासी होते. त्यांच्या पश्चात पत्नी, सहावर्षांची मुलगी आणि आई-वडिल असा परिवार आहे. त्यांची पत्नी सुद्धा इंडियन एअरफोर्समध्ये अधिकारी आहे. सुजानपूर तिरा येथील सैनिकी शाळेतून त्यांनी त्यांचं शिक्षण पूर्ण केलं. भारत रक्षक वेबसाइटनुसार, 24 डिसेंबर 2009 रोजी ते इंडियन एअर फोर्सच्या सेवेत रुजू झाले.
आई-वडिल कुठे आहेत?
“नमांश यांचे आई-वडिल सध्या तामिळनाडू कोईम्बतोर येथील सुलूर एअर फोर्स स्टेशन येथे आहेत. पत्नी कोलकाताला कोर्ससाठी गेली आहे. वडिल जगन्नाथ स्याल इंडियन आर्मीच्या वैद्यकीय विभागात होते” अशी माहिती नमांश यांचे नातेवाईक रमेश कुमार यांनी दिली.
किती देश एअर शो मध्ये सहभागी झालेले?
दुबई एअर शो मध्ये जगातील अनेक एअर फोर्स सहभागी होतात. जगातील अत्याधुनिक फायटर विमानं येथे पहायला मिळतात. 150 पेक्षा जास्त देशांनी आपलं हवाई कौशल्या या शो मध्ये दाखवलं. 17 नोव्हेंबरला या एअर शो ची सुरुवात झालेली.