Explained : तेजस फायटर जेट कोसळणं भारतासाठी झटका का? किती देशांना या विमानाच्या खरेदीत इंटरेस्ट आहे?
Tejas Fighter Jet Crash : आज दुबई एअर शो मध्ये तेजस फायटर विमान कोसळलं. हा भारताच्या प्रतिष्ठेसाठी मोठा धक्का आहे. कारण तेजस आपला अभिमान, स्वाभिमान आहेच. पण तेजस विमानावर अन्य गणित सुद्धा अवलंबून आहेत. तेजसचं कोसळणं आपल्यासाठी झटका का आहे? समजून घ्या.

तेजस लढाऊ विमान हे भारताचं अभिमान आहे. तेजस हे स्वदेशी बनावटीचं फायटर विमान आहे. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने (एचएएल) या विमानाची निर्मिती केलीय. भारताचे दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी या लढाऊ विमानाला तेजस हे नाव दिलं. भविष्यात भारताच्या संरक्षणात तेजसची भूमिका महत्वाची असणार आहे. सोवियत युनियनच्या काळातील मिग-21 बायसन या विमानांची जागा घेण्यासाठी तेजसची निर्मिती झाली आहे. तेजस हे 4.5 जनरेशनच फायटर विमान आहे. आजच्या काळातील अन्य अत्याधुनिक फायटर विमानांप्रमाणे तेजस आहे. तेजस विमानांच्या निर्माण प्रक्रियेत HAL ला अनेक अड्थळ्यांना सामोरं जावं लागलं. पण भारताने स्वबळावर हे विमान विकसित केलं. या विमानाच्या निर्मितीमध्ये अजूनही अनेक आव्हान आहेत. ती पार करण्याचा आपण प्रयत्न करतोय.
प्रामुख्याने सध्या तेजससाठी इंजिनचा प्रश्न आहे. आधी आपण तेजससाठी कावेरी इंजिन विकसित करण्याचा प्रयत्न केला. पण हा प्रकल्प पूर्णत्वाला जाऊ शकला नाही. त्यामुळे तेजससाठी आता अमेरिकी कंपनी जनरल इलेक्ट्रिक (GE) F404-IN20 इंजिन देणार आहे. आपण तसा जनरल इलेक्ट्रिक सोबत करार केला आहे. इंडियन एअर फोर्सने 40 तेजस मार्क 1 आणि 83 तेजस मार्क 1 ए ची ऑर्डर HAL ला दिली आहे. पण इंजिनमुळे HALला वेळेवर इंडियन एअर फोर्सला या विमानांचा पुरवठा करता आलेला नाही.
तेजस तातडीने का हवं?
चीन आणि पाकिस्तान यांचा एकाचवेळी सामना करण्यासाठी आपल्याला 42 स्क्वाड्रनची आवश्यकता आहे. एका स्क्वाड्रनमध्ये 18 फायटर जेट असतात. मिग-21 बायसन विमाने रिटायर झाल्यामुळे आपल्याला तेजसची तितकीच तातडीने आवश्यकता आहे. 2016 पासून 2025 पर्यंत तीन वेळा पाकिस्तानसोबत सैन्य संघर्ष झाला आहे. चीनसोबत गलवान, लडाख या प्रदेशात अनेकदा तणावाची स्थिती उदभवली. आपल्या ज्या दोन देशांचा शेजार लाभला आहे ते लक्षात घेता, तेजसची निकड तातडीने पूर्ण होणं गरजेच आहे.
कुठले देश तेजसचे संभाव्य खरेदीदार?
आपण नुसतं तेजस आपल्या गरजेपुरता बनवण्याचा विचार करत नाहीय. तेजस फायटर जेटची निर्यात सुद्धा आपल्या डोळ्यासमोर आहे. त्यासाठी जगातील काही देशांसोबत आपली बोलणी सुद्धा सुरु आहेत. मलेशिया, अर्जेंटिना, इजिप्त, नायजेरिया, फिलीपाईन्स, इंडोनेशिया हे देश तेजसचे संभाव्य खरेदीदार असू शकतात.
तेजसची खासियत काय?
तेजसची खासियत म्हणजे ते मल्टीरोल आहे. फक्त युद्ध लढणच नाही, एकाचवेळी वेगवेगळी काम करण्यास हे जेट सक्षम आहे. दुसरी म्हणजे याचं वजन आणि किंमत. तेजस हलकं लढाऊ विमान आहे आणि याची प्राइस एकदम जास्त नाहीय. एअर शो मध्ये विविध देश आपल्या फायटर विमानाचं हवाई कसरतीच्या माध्यमातून प्रदर्शन करुन नवीन ग्राहक मिळवण्याचा प्रयत्न करतात. आज दुबई एअर शो मध्ये तेजसला झालेला भीषण अपघात त्यामुळे आपल्यासाठी एक मोठा झटका आहे. थेट आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिष्ठेला बसलेला धक्का आहे.
