विमानाच्या खिडक्यांना छोटं छिद्र का असतं? त्याचा उपयोग तुम्हालाही माहिती नसेल

तुम्ही कधी विमानातून प्रवास केला आहे का? जर तुम्ही विमानातून प्रवास केला असेल तर तुम्हाला विमानाच्या खिडकीला एक छोटं छिद्र देखील दिसलं असेल. तुम्हाला कधी असा प्रश्न पडला आहे का हे छिद्र नेमकं कशासाठी असतं?

विमानाच्या खिडक्यांना छोटं छिद्र का असतं? त्याचा उपयोग तुम्हालाही माहिती नसेल
airplane
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: May 10, 2026 | 6:31 PM

तुम्ही अनेकदा विमानाने प्रवास केलाच असेल. काही जण नेहमीच विमानाने प्रवास करतात, तर काही जण असे असतात की ते आपल्या आयुष्यात पहिल्यांदाच विमानाने प्रवास करतात. विमानात विंडो सीटवर बसून ढगांच्यावर सुंदर दृष्य बघणं हा एक वेगळाच अनुभव असतो. मात्र तुम्ही विमानातून प्रवास करताना कधी काळजीपूर्वक पाहिलं आहे का? की विमानाच्या खिडकीला खालच्या बाजूने एक खूप छोटं छिद्र असतं. जर तुम्ही देखील हे छिद्र पाहिलं असेल तर तुम्हाला कधी असा प्रश्न पडला आहे का की या छिद्राचं नेमकं काम काय असावं? जे प्रवासी हे छिद्र पहिल्यांदा पाहातात तेव्हा त्यांच्या मनात त्याबद्दल अनेक प्रश्न असतात. जसं की या छिद्रामुळे बाहेरची हवा तर आत येणार नाही ना? या छिंद्रामुळे काच तर फुटणार नाही ना? पण तुम्हाला हे माहीत आहे का? या छिद्राचा नक्की उपयोग काय असतो ते?

या छोट्या छिद्राला ब्लीड होल किंवा ब्रीदर असं देखील म्हटलं जातं. हे छोटसं होल तुमच्या सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचं असतं. विमानाची खिडकी ही काचेपासून नाही तर अ‍ॅक्रॅलिकपासून बनलेली असते. या खिडकीला सामान्यपणे तीन लेअर असतात. विमानाच्या खिडकीची सर्वात बाहेरची जी लेअर असते ती लेअर पाऊस आणि वातावरणातील बदलाचा दबाव सहन करण्यासाठी बनलेली असते. विमानाच्या दुसऱ्या लेअरला हे छोटसं छिद्र असतं. तर विमानाची तिसरी लेअर ही प्रवाशांच्या खूपच जवळ असते, या लेअरमुळे प्रवाशांना आरामदायी प्रवासासाठी मदत होते.

जेव्हा विमान हे 30,000 ते 40,000 फूट उंचावरून उडत असतं तेव्हा बाह्य हवेचा दाब हा खूप कमी असतो. मात्र बाहेरील हवेचा दाब हा कितीही कमी असला तरी त्याचा परिणाम हा विमानातील प्रवाशांवर होत नाही, कारण तशी यंत्रणा विमानात असते. हे छोटं छिद्र यासाठी बनवण्यात आलेलं असतं की बाहेरची हवा आणि विमानातील हवा यामध्ये योग्य ते संतुलन साधलं जावं. या छिद्रामधून विमानातील हवेचा दाब हा थेट विमानाच्या खिडकीच्या बाहेर जी पहिली लेअर असते, त्यावर पडतो. त्यामुळे आतील प्रवासी सुरक्षीत राहतात.

Follow Us