
देशातील सर्वात मोठे वृत्तवाहिनी नेटवर्क असलेल्या टीव्ही 9 च्या ‘व्हॉट इंडिया थिंक टुडे’ (WITT 2025) या जागतिक परिषदेचे आयोजन करण्यात आले. यावेळी केंद्रीय रेल्वे आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि सोशल मीडियाच्या गैरवापराच्या मुद्द्यांवर स्पष्टपणे भाष्य केले. यावेळी अश्विनी वैष्णव यांनी कॉमेडिअन कुणाल कामराच्या वादावरही प्रतिक्रिया दिली. जे लोक संविधानाचा दाखला देतात, त्यांनी ते वाचायलाही हवे, असे अश्विनी वैष्णव म्हणाले. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आवश्यक असले, तरी त्याची मर्यादा पाळणेही गरजेचे आहे, असे अश्विनी वैष्णव म्हणाले.
अश्विनी वैष्णव यांनी सोशल मीडियावर वेगाने पसरणाऱ्या चुकीच्या बातम्या आणि देशविरोधी आशयाबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली. सरकार या विषयाला अत्यंत गांभीर्याने घेत आहे. यासंबंधित सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्ससोबत समन्वय साधून तोडगा काढण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. चुकीच्या माहितीचा प्रसार रोखण्यासाठी जनतेमध्ये जागरूकता निर्माण करणे गरजेचे आहे, असे अश्विनी वैष्णव यांनी म्हटले.
अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली काही लोक आपली लक्ष्मण रेषा ओलांडत आहे. संविधानाने प्रत्येक नागरिकाला अधिकार दिले आहेत. परंतु त्यासोबतच काही जबाबदाऱ्याही दिल्या आहेत, याची आठवण करुन द्यावी, असे मला वाटते. सरकार अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे संरक्षण करण्यास पूर्णपणे कटिबद्ध आहे. मात्र जर त्याचा वापर देशाची एकात्मता आणि समाजात अशांती निर्माण करण्यासाठी केला जात असेल, तर त्यावर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा अश्विनी वैष्णव यांनी दिला.
ओटीटी प्लॅटफॉर्म्ससाठीही नियमावली लागू करण्यात आली आहे. या संदर्भात देशात यापूर्वीच कायदे अस्तित्वात आहेत. सरकार सर्व संबंधितांशी चर्चा करून या समस्येवर समाधान शोधण्याचा प्रयत्न करत आहे. डिजीटल माध्यमातील सामग्रीला नियंत्रित करण्यासाठी नियम तयार करण्यात आले आहेत. त्यांचे योग्य पालन सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक पावलं उचलली जात आहेत, असे अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केले.
बिहारमधील लवकरच निवडणुका होणार आहेत. या आगामी विधानसभा निवडणुकीवर भाष्य करताना अश्विनी वैष्णव यांनी काँग्रेसवर टीका केली. काँग्रेसने देशावर ५० ते ६० वर्षे राज्य केले. परंतु त्या काळात तरुणांसाठी कोणताही मोठा बदल घडवून आणला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाने विकासाच्या नवनवीन उंची गाठल्या आहेत. देशभरातील जनता पंतप्रधान नरेंद्री मोदींच्या कामावर समाधानी आहे, म्हणूनच त्यांना वारंवार जनतेचा पाठिंबा मिळत आहे, असा विश्वास अश्विनी वैष्णव यांनी व्यक्त केला.