
World Sickle Cell Day : सिकलसेल हा असा आजार आहे, ज्याची अनेकांना फारशी माहिती नाही. मात्र या आजारामुळे रुग्णाला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. योग्य उपचार आणि मार्गदर्शन मिळाल्यास रुग्ण या आजाराशी उत्तमरित्या लढा देऊ शकतो. या आजाराविषयी लोकांमध्ये जागृती निर्माण व्हावी यासाठी जगभरात जागतिक सिकलसेल डे साजरा केला जातो. केंद्रीय आदिवासी मंत्रालयानेही भगवान बिरसा मुंडा चेअरच्या सहकार्याने दिल्लीतील एम्समध्ये जागतिक सिकलसेल दिनी विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले.
सिकलसेल हा एक अनुवांशिक आजार आहे. यामुळे अॅनिमिया, तीव्र वेदना, रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेजेस होणे, शरीरातील वेगवेगळ्या अवयवांचे नुकसान होते. या आजारामुळे आर्युमानातही घट होते. हा आजार मुख्यत्वे: आदिवासी लोकांमध्ये दिसून येतो.
सिकलसेल अॅनिमियाचे निर्मूलन करण्याची मोहीम 1 जुलै 2023 रोजी मध्य प्रदेशातील शहडोल येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते चालू करण्यात आली. सिकलसेल अॅनिमिया या आजाराबाबत आदिवासी लोकांमध्ये जागृती निर्माण व्हावी यासाठी आदिवासी व्यवहार मंत्रालय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयासोबत (MoHFW) काम करत आहे.
या कार्यक्रमात सिकलसेल अॅनिमिया या आजारावरील औषध विकसित व्हावे, त्याला प्रोत्साहन आणि चालना मिळावी यासाठी आदिवासी व्यवहार मंत्रालयातर्फे भगवान बिरसा मुंडा पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. एम्स रुग्णालयाअंतर्गत आदिवासी आरोग्य आणि संशोधन संस्थेसाठी प्रगत केंद्राची स्थापना करण्याचीही घोषणा करण्यात आली.
याआधी देशभरातील एम्स रुग्णालयांसह 15 टर्शियरी केअर हॉस्पिटल्समध्ये एससीडीचे अत्याधुनिक निदान आणि व्यवस्थापन प्रदान करणारे क्षमता केंद्र (सीओसी) विकसित करण्यास सरकारने मंजुरी दिलेली आहे.
जगभरात 19 जून हा दिवस जागतिक सिकलसेल दिन म्हणून साजरा केला जातो. लोकांना या आजाराबद्दल समजावे, या आजाराचा परिणाम, त्याचे लवकर निदान आणि व्यवस्थापना याचे महत्त्व समजावे, यासाठी हा दिवस साजरा केला जातो. जागतिक सिकलसेल दिनाच्या पार्श्वभूमीवर 17 राज्यांत विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.