
देशातील नक्षलवाद संपवण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. अशातत आता गोंदियामध्ये सीपीआय (माओवादी) नक्षलवादी संघटनेचा प्रमुख नेता अनंत उर्फ विकास नागपुरे उर्फ विनोद राधास्वामीने 11 सहकाऱ्यांसह आत्मसमर्पण केले आहे.

विकास नागपुरेवर 25 लाख रुपयांचे बक्षीस होते. विकासच्या आत्मसमर्पणामुळे खैरलांजी हत्याकांड (2006) आणि भीमा कोरेगाव हिंसाचार (2018 ) सारख्या प्रकरणांमधील नक्षलवाद्यांच्या सहभागाबाबतचे रहस्य उलगडू शकते.

अंदाजे 50 वर्षांचा असलेल्या विकासचा जन्म एका नक्षलवादी कुटुंबात झाला होते. त्याचे पालक नक्षलवादी होते. विकासचे शिक्षण मुंबईत झाले, त्यानंतर त्याने नक्षलवादी प्रेरित विद्यार्थी संघटनांमध्ये काम केले. त्याने विदर्भातील दलित-पीडित तरुणांना क्रांतिकारी भाषणांनी प्रभावित करून त्यांची भरती केली.

महाराष्ट्र-मध्यप्रदेश-छत्तीसगड (एमएमसी) विशेष क्षेत्रीय समितीचा प्रवक्ता विकासने 24 नोव्हेंबरला आत्मसमर्पणाची तयारी दर्शवत 15 फेब्रुवारीपर्यंत मुदत मागितली होती. मात्र आता त्याआधीच त्याने गोंदिया पोलीसांसमोर आत्मसमर्पण केले आहे.

आत्मसमर्पण केलेल्या इतर नक्षलवाद्यांमध्ये डीव्हीसीएम कमांडर नागसु गोलू वड्डे, रानो पोरेटी, संतु पोरेटी, संगीता पंधरे, प्रताप बंतूला, अनुजा कारा, पुजा मुडीयम, दिनेश सोट्टी, शीला मडावी, अर्जुन दोडी यांचा समावेश आहे. या सर्वांनी आपली हत्यारे जमा केली आहेत.