1400 कोटींचा बजेट, कमाई फक्त 6 कोटी; फिल्म इंडस्ट्रीतील सर्वांत फ्लॉप चित्रपट
तब्बल 1400 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेला आणि दिग्गज कलाकारांच्या भूमिका असलेला हा चित्रपट आतापर्यंतचा सर्वांत फ्लॉप ठरला आहे. जगभरात या चित्रपटाने फक्त सहा कोटी रुपये कमावले आहेत. ही कमाई बजेटच्या एक टक्कासुद्धा नाही.

आजकाल जगभरातील फिल्म इंडस्ट्रीमध्ये एकापेक्षा एक बिग बजेट चित्रपट बनवले जात आहेत. एकीकडे भारतात 'वाराणसी' आणि 'रामायण' यांसारख्या आतापर्यंतच्या सर्वांत महागड्या चित्रपटांची चर्चा आहे. तर दुसरीकडे दक्षिण कोरियामधील ड्रामासुद्धा याच स्तरावर काम करत आहेत. चीनने नुकताच 'ने झा 2'च्या माध्यमातून पहिला बिलियन डॉलरचा ब्लॉकबस्टर चित्रपट दिला.

सौदी अरबच्या फिल्म इंडस्ट्रीनेही असाच काहीसा प्रयत्न केला आणि हॉलिवूडमधल्या मोठ्या कलाकारांसोबत भव्यदिव्य चित्रपट बनवला. परंतु चित्रपटाचा बजेट मोठा असूनही, त्यात दमदार कलाकार असूनही तो प्रेक्षकांची मनं जिंकू शकला नाही. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दणक्यात आपटला आणि इतिहासातील सर्वांत मोठा फ्लॉप चित्रपट ठरला.

नोव्हेंबर 2021 मध्ये सौदी अरबचा मीडिया समूह एमबीसी ग्रुपच्या फिल्म कंपनीने 'डेझर्ट वॉरियर' नावाच्या मोठ्या चित्रपटाची घोषणा केली. या चित्रपटाची निर्मिती मोठमोठ्या कंपन्यांन केली होती. सातव्या शतकातील अरबस्तानात घडणाऱ्या या चित्रपटाची कथा राजकुमार हिंदभोवती फिरते, जी महान योद्धा हंझालाच्या मदतीने सम्राट किसराविरुद्ध मोहीम सुरू करते. या चित्रपटात जबरदस्त स्टारकास्ट आहे. मार्व्हलचा नवीन कॅप्टन अमेरिका, अँथनी मॅकीने यात हंझालची आणि ऑस्कर विजेते बेन किंग्स्ले यांनी सम्राट किसराची भूमिका साकारली आहे.

हा चित्रपट खरोखरच हॉलिवूड आणि अरबी सिनेमांचा एक अनोखा संगम होता. चित्रपटाच्या निर्मितीसाठी स्थानिकांना प्रशिक्षण देण्यासाठी सौदी अरेबियामध्ये एक आंतरराष्ट्रीय चमू आणण्यात आला होता. सेटवर दररोज 400 ते 500 लोक उपस्थित असायचे. स्टारकास्टचं अवाढव्य मानधन आणि निर्मितीतील विलंब यांमुळे चित्रपटाचं बजेट तब्बल 150 दशलक्ष डॉलर्सपर्यंत (सुमारे 1400 कोटी रुपये) वाढलं होतं.

हा चित्रपट दोन वर्षांहून अधिक काळ पोस्ट प्रॉडक्शनमध्ये अडकला होता. अखेरीस 2025 च्या झुरीच चित्रपट महोत्सवात त्याचा प्रीमिअर पार पडला. त्यानंतर एप्रिल 2026 मध्ये जेव्हा तो जगभरातील थिएटर्समध्ये प्रदर्शित झाला, तेव्हा तो बॉक्स ऑफिसवर सपशेल अपयशी ठरला. हा चित्रपट केवळ अमेरिकेतच नाही तर खुद्द सौदी अरेबियामध्येही प्रेक्षकांनी नाकारला.

सौदी अरेबियामध्ये या चित्रपटाची कामगिरी आणखीच खराब झाली. पहिल्या आठवड्यात या चित्रपटाने फक्त 87000 डॉलर्सची कमाई केली. पहिल्या आठवड्यातील निराशाजनक कामगिरीनंतर जगभरातील थिएटर्समधून हा चित्रपट काढण्यात आला, तर काही ठिकाणी त्याचे शोज कमी केले.

या चित्रपटाची जगभरातील एकूण कमाई फक्त सहा कोटी रुपये इतकी आहे, जी बजेटच्या 0.4 टक्क्यांपेक्षाही कमी आहे. एकूण बजेटच्या 99.6 टक्के तोटा झाल्यामुळे हा चित्रपट इतिहासातील सर्वांत फ्लॉप ठरला आहे. एखाद्या चित्रपटासाठी इतका मोठा तोटा यापूर्वी कधीही पाहिला गेला नव्हता.

'डेझर्ट वॉरियर'च्या अपयशाचं मुख्य कारण म्हणजे खराब मार्केटिंग आणि चित्रपटाभोवती पसरलेली नकारात्मक प्रसिद्धी. पोस्ट प्रॉडक्शनच्या विलंबामुळे, घोषणेच्या आणि शूटिंगच्या काळात निर्माण झालेल्या सर्व चर्चा नाहिशा झाल्या होत्या. पाश्चिमात्य देशांमध्ये या चित्रपटाचं अत्यंत कमी प्रमोशन झालं आणि मुख्य अभिनेता अँथनी मॅकी यानेसुद्धा स्वत:ला चित्रपटापासून दूर केलं.