मुंबईत घर शोधताना सुपरहिट मालिकेत मिळाली काम करण्याची संधी, आज कोट्यवधींच्या कारमध्ये फिरतो हा अभिनेता
60 वर्षांचा बॉलिवूड अभिनेता, ज्याला मुंबईत घर शोधता-शोधता सुपरहिट मालिकेत काम करण्याची मिळाली संधी. चालतच गेला होता ऑडिशन देण्यासाठी. आज कोट्यवधींच्या कारमध्ये फिरतो. कोण आहे हा अभिनेता?

दूरदर्शनवरील ‘रामायण’ आणि ‘महाभारत’ यांसारख्या लोकप्रिय मालिकांबरोबरच काही मालिकांनी प्रेक्षकांना उत्तम मनोरंजनासोबतच प्रेरणादायी कथा दिल्या. त्यापैकीच एक म्हणजे 1988 मध्ये प्रसारित झालेली ‘फौजी’ ही मालिका. या मालिकेमुळेच पुढे शाहरुख खानला बॉलिवूडचा ‘किंग खान’ म्हणून ओळख मिळाली.

आज जगभरात सुपरस्टार म्हणून प्रसिद्ध असलेल्या शाहरुख खानने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात चित्रपटांमधून नाही तर दूरदर्शनवरील मालिकांमधून केली होती. कोणताही फिल्मी वारसा नसतानाही त्याने मेहनत, जिद्द आणि अभिनयाच्या जोरावर स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले.

‘फौजी’ या मालिकेत शाहरुखने लेफ्टनंट अभिमन्यू राय ही भूमिका साकारली होती. भारतीय सैन्यातील प्रशिक्षण, शिस्त, आव्हाने आणि सैनिकांचे जीवन यांचे वास्तववादी चित्रण या मालिकेत करण्यात आले होते. शाहरुखच्या नैसर्गिक अभिनयाने, प्रभावी संवादफेकीने आणि दमदार व्यक्तिमत्त्वाने प्रेक्षकांची मने जिंकली.

एका जुन्या मुलाखतीत शाहरुख खानने सांगितले होते की, त्याला ही मालिका अगदी अनपेक्षितपणे मिळाली. मुंबईत घर शोधत असताना त्याची ओळख एका प्रॉपर्टी डीलरशी झाली. त्या व्यक्तीचे दूरचित्रवाणी क्षेत्राशी संबंध होते. शाहरुखच्या आईने त्यांना मुलगा नाट्यप्रयोगांमध्ये काम करतो आणि अभिनयात कुशल असल्याचे सांगितले.

त्यानंतर त्याला ऑडिशनची संधी मिळाली आणि त्याने आपल्या अभिनयाने सर्वांना प्रभावित करत ‘फौजी’मध्ये स्थान मिळवले. आजही ‘फौजी’ ही मालिका शाहरुख खानच्या कारकिर्दीतील महत्त्वाचा टप्पा मानली जाते.