
महाराष्ट्राचे लाडके भावोजी अर्थात अभिनेते आदेश बांदेकर यांचा मुलगा सोहम बांदेकर लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याची जोरदार चर्चा आहे. एका प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीशी तो लग्न करणार असल्याचं म्हटलं जात आहे.

सोहमने निर्मिती क्षेत्रात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. 'ललित 205' या मालिकेची त्याने निर्मिती केली होती. याशिवाय 'नवे लक्ष्य' या मालिकेतून त्याने अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं.

सोहम लवकरच अभिनेत्री पूजा बिरारीशी लग्न करणार असल्याचं वृत्त 'राजश्री मराठी'ने सूत्रांमार्फत दिलं आहे. पूजाने 'येड लागलं प्रेमाचं' या मालिकेत मंजिरीची भूमिका साकारली होती.

'साजणा' आणि 'स्वाभिमान- शोध अस्तित्वाचा' यांसारख्या मालिकांमध्येही तिने काम केलंय. स्वाभिमान या मालिकेतून तिला विशेष प्रसिद्धी मिळाली आहे. इन्स्टाग्रामवर तिचा मोठा चाहतावर्ग आहे.

याआधी सोशल मीडियावर आस्क मी एनिथिंग या सेशनमध्ये सोहमने लग्नासाठी त्याला कशी मुलगी हवी आहे, याबाबतचा खुलासा केला होता. चाहत्याच्या प्रश्नावर त्याने उत्तर दिलं होतं, 'कशीही चालेल, आईला आवडली पाहिजे बस.'