
'आई कुठे काय करते' या मालिकेतून अभिनेता ओमकार गोवर्धनची एग्झिट झाली आहे. मालिकेत तो आशुतोष केळकरची भूमिका साकारत होता. याविषयी आता अरुंधीतीची भूमिका साकारणारी अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरने सोशल मीडियावर खास पोस्ट लिहिली आहे.

या पोस्टमध्ये मधुराणीने लिहिलं, 'मधले काही दिवस कोणतीही पोस्ट करायच्या मनस्थितीमध्ये नव्हते. त्यामुळे ही उशिराने डकवतेय. आशुतोषचं 'जाणं' अनेकांना आवडलं नाहीये. कसं आवडेल? आयुष्यात घडणाऱ्या अप्रिय घटना आवडत नाहीतच आपल्याला, पण स्वीकाराव्या लागतातच. तसंच आशुतोष जाणं आपल्याला स्वीकारावं लागेल.'

'गेले अनेक दिवस दुखवट्याचे सीन्स करतेय. 12-13 तास सलग असे काही दिवस रडतेय. अभिनय अभिनय म्हटलं तरी तुमच्यातला एक भाग तुम्ही ओतता, काही पणाला लावता तेव्हाच तो खरा वाटतो. हे काही दिवस प्रचंड थकवणारं होतं. इतकं की त्याचा काही प्रमाणात तब्येतीवरही परिणाम झालाच,' असं तिने सांगितलं.

याविषयी मधुराणी पुढे लिहिते, 'डेली सोपमध्ये भावनिक व्यवस्थापन करण्यासाठी बऱ्याचदा वेळ मिळत नाही आणि त्याचे परिणाम दिसून येतात. अरुंधती आशुतोष ला मिस करतेय तशीच आम्हाला सगळ्यांना ओंकारची तितकीच आठवण येतेय. ओंकार, आपल्या फालतूपासून गंभीर विषयावरच्या गप्पा, 90s ची गाणी मोठमोठ्याने गाणं, विषय कुठलाही असो त्यातलं तुला सखोल माहीत असणं आणि आजूबाजूचं वातावरण हसत खेळत ठेवायचं तुझं कसब हे सगळं मिस होतंय.'

मधुराणीच्या या खास पोस्टवर ओमकारनेही कमेंट केली आहे. 'मधुराणी मला पण तुझी आठवण कायम येईल. आपण खूप चांगलं काम केलं. एकत्र पुन्हा आपण एकत्र काम करूच. तोपर्यंत पुन्हा लवकरात लवकर भेटण्याची आशा आहेच. प्रेम आणि सदिच्छा,' असं त्याने लिहिलंय.