
मराठी चित्रपटसृष्टी, टीव्ही मालिका, हिंदीतही छोटा पडदा गाजवणारी अभिनेत्री प्रिया मराठे हिचं वयाच्या 38 व्या वर्षी निधन झालं. गेल्या 2 वर्षांपासून ती कॅन्सरशी झुंज देत होती, मात्र 31 ऑगस्ट रोजी तिने अखेरचा श्वास घेतला.

तिच्या अकस्मात एक्झिटमुळे चित्रपटसृष्टीतील कलाकारांप्रमाणेच तिच्या चाहत्यांनाही मोठा धक्का बसला आहे. प्रियाच्या जाण्यामुळे मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना व्यक्त करत तिचे अनेक मित्र-मैत्रीणी, सेलिब्रिटी, सहकलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहीत तिला श्रद्धांजली वाहिली आहे.

माझिया प्रियाला प्रीत कळेना, माझ्या नवऱ्याची बायको, तुझेच मी गीत गात आहे, अशा अनेक मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेला अभिनेता अभिजीत खांडकेकर यानेही प्रियासाठी एक खास पोस्ट लिहीली आहे.

त्या दोघांनी तुझेच मी गीत गात आहे या मालिकेत एकत्र काम केलं होतं. दोघांची चांगली मैत्री होती, मात्र आता प्रियाला गमावल्यानंतर अभिजीतने त्यांचे काही फोटो सोशल मीडियावर टाकत प्रियासाठी भावूक मेसेज लिहीत तिच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

नावाप्रमाणे सगळ्यांना प्रिय असलेली प्रिया . अजूनही खरच वाटत नाहीये की तू आता नाहीयेस आमच्यात. भावपूर्ण श्रद्धांजली, अकाली एग्जिट वगैरे शब्द तुझ्या संदर्भात वापरले जातायत हे पटतच नाहीये मनाला.

आयुष्य इतकं भरभरून जगणारी तू शेवटच्या अवघ्या 2 वर्षात काय काय सहन करून गेलीस ह्याची कल्पना ही करवत नाही. शंतनू तू ज्या धीराने तिच्या बरोबर होतास त्याला तोड नाही.

‘लवकर बरी होणार आहेस तू , बरी झालीस की मस्त पार्टी करू ‘ असे आमचे खोटे दिलासे शेवटी निरर्थकच ठरले,अशा शब्दांत अभिजीतने खंत व्यक्त केली. तू नसल्याची सवय करून घ्यावी लागणार आहे . तू अजून हवी होतीस प्रिया ❤️, असंही अभिजीतने त्याच्या पोस्टमध्ये लिहीलं आहे.