
अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघाताने संपूर्ण देशाला हादरवून सोडले आहे. अहमदाबादहून लंडनला जाण्यासाठी उड्डाण घेतल्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच एअर इंडियाचे विमान खाली कोसळले. या विमानात २४२ प्रवाशी होते.

या विमानाचा अपघात मेघानीनगरच्या निवासी भागात झाला. या ठिकाणी बीजे मेडिकल कॉलेज आहे. हे विमान थेट या कॉलेजच्या हॉस्टेलच्या इमारतीत घुसले.

या घटनेत २० विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे, मात्र याची अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

एअर इंडियाचे एक ड्रीमलाइनर विमान टेकऑफनंतर काही मिनिटातच कोसळले आणि बीजे मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलच्या इमारतीला धडकले.

ही धडक इतकी जबरदस्त होती की, हे विमान हॉस्टेलच्या भिंतीतून आरपार घुसले. याचे काही फोटोही समोर आले आहेत.

हे विमान हॉस्टेलच्या भिंतीला भगदाड पाडून आत घुसल्याचे पाहायला मिळत आहे.

हा अपघात अहमदाबादच्या मेघानी नगर परिसरात असलेल्या बीजे मेडिकल कॉलेजच्या अंडरग्रेजुएट हॉस्टेलच्या मेसजवळ घडला.

दुपारी १:३८ वाजण्याच्या सुमारास या मेसमध्ये बहुतेक विद्यार्थी जेवण करत होते. तेव्हाच ड्रीमलाइनर विमान अचानक अनियंत्रित होऊन थेट इमारतीवर कोसळले.

हा अपघात इतका भयानक होता की, या इमारतीची छप्पर आणि भिंत पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आणि अनेक विद्यार्थी जखमी झाले.

या फोटोत विमानाच्या पुढचा भाग कशाप्रकारे हॉस्टेलच्या भिंतीत पूर्णपणे घुसला आहे, हे स्पष्ट पाहायला मिळत आहे. तसेच इमारतीचे स्लॅब आणि भिंत तुटलेल्या अवस्थेत आहे.

या अपघातामुळे आजूबाजूचे झाडे आणि वीजेच्या तारांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हे फोटोद्वारे अपघाताची भीषणता दिसत आहे.

या अपघातामुळे राज्यात शोककळा पसरली आहे.