
'गुम है किसी के प्यार में' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली जोडी ऐश्वर्या शर्मा आणि नील भट्ट सध्या त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहेत. गेल्या काही दिवसांपासून या दोघांच्या नात्यात सर्वकाही आलबेल नसल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. इतकंच नव्हे तर ऐश्वर्या आणि नील वेगवेगळे राहत असल्याचंही कळतंय.

आता दिवाळीनिमित्त ऐश्वर्याने तिच्या इन्स्टाग्रामवर काही फोटो पोस्ट केले आहेत. मात्र या फोटोंमध्ये नील कुठेच दिसला नाही. याआधी गणेशोत्सवादरम्यानही ऐश्वर्याने फक्त स्वत:चेच फोटो शेअर केले होते. किंबहुना गेल्या काही महिन्यांपासून ऐश्वर्या किंवा नील दोघंही एकमेकांसोबत दिसले नाहीत.

ऐश्वर्याचे हे फोटो पाहून नेटकऱ्यांनी त्यावर विविध प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. 'खरंच विभक्त होत असाल तर चाहत्यांना अंधारात ठेवू नका', असं एकाने म्हटलं. तर 'तुम्ही तुमच्या नात्याबद्दल स्पष्ट का नाही सांगत', असा सवाल दुसऱ्याने केला.

ऐश्वर्या शर्मा आणि नील भट्ट यांनी 30 नोव्हेंबर 2021 रोजी मध्य प्रदेशमधल्या उज्जैन इथं लग्न केलं. या दोघांची पहिली भेट ‘गुम है किसी के प्यार में’ या मालिकेच्या सेटवरच झाली होती. त्यानंतर या दोघांनी ‘बिग बॉस 17’मध्ये एकत्र भाग घेतला होता.

याआधी एका पोस्टमध्ये ऐश्वर्याने ट्रोलर्सना उत्तर दिलं होतं "माझं आयुष्य हे तुमच्या कंटेटचा विषय नाही. माझं मौन म्हणजे तुमच्यासाठी परवानगी नाही. हे लक्षात ठेवा की, एखादी व्यक्ती गप्प असेल तर त्याचा अर्थ त्यांच्याकडे बोलायला काही नाही असा होत नाही. त्याचा अर्थ असा होतो की ते गोंगाटापेक्षा आदरपूर्वक वागण्याची निवड करत आहेत," असं तिने लिहिलं होतं.