
अजित पवार गटाचे मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज सकाळी शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचं दिलीप वळसे पाटील यांनी सांगितलं.

विशेष म्हणजे या बैठकीनंतर आज दुपारी पुण्यात बाणेरमध्ये महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. शरद पवारांचे बंधू प्रतापराव पवार यांचं बाणेरमध्ये निवासस्थान आहे. त्यांच्या निवासस्थानी शरद पवार, अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह पवार कुटुंबातील अनेकजण आले होते

प्रतापराव पवार यांच्या निवासस्थानी शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यात तासभर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या चर्चांनंतर घडामोडी इथेच थांबलेल्या नाहीत.

अजित पवार अचानक प्रतापराव पवार यांच्या निवासस्थानाहून पुणे विमानतळावर गेले. तिथून ते दिल्लीच्या दिशेला रवाना झालेले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार अमित शाहांची भेट घेण्याची शक्यता आहे. अजित दादांसह प्रफुल पटेल देखील अमित शाहांना भेटणार असल्याच्या चर्चा आहेत.

अजित पवार गेल्या काही दिवसांपासून नाराज असल्याची चर्चा आहे. दिल्लीत आज अजित दादा पवार गटाची भेट. अजितदादांच्या दिल्लीला रवाना होण्यावर शरद पवारांनी बोलणं टाळलं.