अर्चना पुरण सिंह यांच्या मुलाचं ड्रीम होम; 50 कोटींच्या घरात महादेव-पार्वतीच्या खास पेंटिंगचीच चर्चा
आर्यमानने यापूर्वी आपल्या घराच्या खरेदीबाबत बोलताना यूट्यूब आणि ब्रँड डील्समधून मिळणाऱ्या कमाईतून स्वतःचं घर घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. सध्या मॅन्शनचं काही काम बाकी असलं तरी आर्यमानने दाखवलेल्या झलकांमधून त्याचं निसर्गरम्य, मिनिमल आणि आध्यात्मिक टच असलेलं ड्रीम होम पाहायला मिळतं.

अभिनेत्री अर्चना पूरण सिंह यांचा मुलगा आर्यमान सेठी सध्या त्याच्या नव्या घरामुळे चर्चेत आहे. मुंबईतील मढ आयलंड परिसरातील त्याच्या नव्या मॅन्शनची झलक त्याने चाहत्यांना दिली आहे. या घराची किंमत तब्बल 50 कोटी रुपये असल्याचं सांगितलं जात आहे.
घराच्या किमतीपेक्षाही त्यातील सुंदर इंटेरिअर, हिरवाईने नटलेलं गार्डन आणि खास महादेव-पार्वतीचं पेंटिंग यामुळे या घराची चर्चा रंगली आहे. आर्यमानने शेअर केलेल्या होम टूरमध्ये सर्वप्रथम घराभोवतीची हिरवाई पाहायला मिळते. मॅन्शनच्या प्रवेशद्वारापासून परिसरात मोठ्या प्रमाणात झाडं आणि विविध प्रकारची रोपं आहेत. त्यामुळे घराला एखाद्या खासगी रिसॉर्टसारखा लूक मिळतो.
निसर्गाच्या सान्निध्यात शांत आणि प्रसन्न वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न या घराच्या डिझाइनमधून दिसतो. घरात प्रवेश केल्यानंतर सर्वांचं लक्ष वेधून घेतात ते मोठे खिडकी-दरवाजे. यामुळे घरातील खोल्यांमध्ये भरपूर नैसर्गिक प्रकाश येतो. भिंतींसाठी प्रामुख्याने हलके रंग वापरण्यात आले आहेत. त्यामुळे घरातील जागा अधिक प्रशस्त आणि हवेशीर दिसते.
आर्यमानने सांगितलं की घरातील लाइटिंग आणि इंटेरिअरचे टेक्स्चर डिझाइन करताना जसा विचार केला होता, त्याच पद्धतीने साकारलं गेलं आहे. मात्र, घराचं काम अद्याप पूर्ण झालेलं नाही. काही ठिकाणी फर्निचर आणि इतर वस्तू अजूनही सेट केल्या जात आहेत.
या घरातील सर्वात खास गोष्ट म्हणजे भगवान शिव आणि माता पार्वती यांचं मोठं कस्टमाइज्ड पेंटिंग. हे चित्र विशेषतः घरासाठी तयार करून घेण्यात आलं आहे. या कलाकृतीमध्ये महादेवांच्या तिसऱ्या डोळ्याच्या चित्रणावरही विशेष विचार करण्यात आला होता.
आर्यमानच्या मते, या पेंटिंगमुळे घराच्या वातावरणात सकारात्मक ऊर्जा जाणवते. घरातील इतर सजावटीच्या वस्तूंच्या तुलनेत हे मोठं आर्टवर्क लक्ष वेधून घेतं. घरात काही अॅबस्ट्रॅक्ट आर्टवर्कचाही वापर करण्यात आला आहे. आर्यमान आणि त्याची होणारी पत्नी अभिनेत्री योगिता बिहानी यांनी घराच्या इंटेरिअरसाठी मिनिमल थीमवर भर दिला आहे. घरात अनावश्यक वस्तूंची गर्दी न करता प्रत्येक जागेला मोकळेपणा देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.