
गोव्याकडून रणजी ट्रॉफीचा सामना खेळताना अर्जुन तेंडुलकरने आज शानदार गोलंदाजी केली. फर्स्ट क्लासमध्ये डेब्यु केल्यानंतर अर्जुन तेंडुलकरने दोन वर्षांनी पहिल्यांदाच पाच विकेट घेण्याचा कारनामा केलाय.

13 नोव्हेंबरला गोवा क्रिकेट अकादमीच्या पोरवोरिम मैदानात अर्जुन तेंडुलकरने नव्या चेंडूने भेदक गोलंदाजी केली. त्याने अरुणाचल प्रदेशच्या फलंदाजांची फळी उद्धवस्त केली.

अर्जुन तेंडुलकरच्या भेदक गोलंदाजीमुळे समोरची टीम अवघ्या 84 रन्सवर ऑलआऊट झाली. अर्जुनने 9 ओव्हरमध्ये 3 मेडन ओव्हर टाकल्या. 25 धावा देऊन 5 विकेट काढल्या.

25 वर्षाच्या अर्जुनने या सामन्याआधी प्रथम श्रेणीच्या 16 सामन्यात 32 विकेट काढून 525 धावा केल्या आहेत. त्याशिवाय लिस्ट ए च्या 15 सामन्यात त्याच्या नावावर 21 विकेट आणि 62 धावा आहेत. 21 T20 सामन्यात 26 विकेट आणि 98 धावा आहेत.

अर्जुन तेंडुलकरसाठी मुंबई इंडियन्सने 20 लाख रुपये मोजून त्याला विकत घेतलं होतं. 2023 मध्ये त्याला आयपीएलमध्ये डेब्युची संधी मिळाली. आतापर्यंत 5 सामन्यात त्याने 3 विकेट घेतलेत. 13 धावा केल्या आहेत. यावेळच्या ऑक्शनमध्ये अर्जुनची बेस प्राइस 30 लाख रुपये आहे.