अर्शद वारसीच्या 150 वर्षे जुन्या व्हिलाला नवं रुप; एका रात्रीचं भाडं किती? तुम्हीही राहू शकता
अर्शद वारसी आणि त्याची पत्नी मारिया गोरेटी यांनी उत्तर गोव्यातील साळीगाव इथल्या 150 वर्षे जुना पोर्तुगीज बंगला पुन्हा नव्याने डेकोरेट केला आहे. या बंगल्यात पर्यटकसुद्धा राहू शकतात.

एखाद्या जुन्या वास्तूला आधुनिक शैलीत रुपांतरित करणं हे होम डेकॉरचं उत्तम उदाहरण आहे. अभिनेता अर्शद वारसी आणि त्याची पत्नी मारिया गोरेटी यांनी गोव्यातील त्यांच्या तब्बल 150 वर्षे जुन्या पोर्तुगीज बंगल्याचं अत्यंत आकर्षक व्हिलामध्ये रुपांतर केलं आहे. या पोर्तुगीज व्हिलाला त्यांनी 'कासा झेन' असं नवीन नाव दिलं आहे.

या 5 बीएचके व्हिलाचं इंटेरिअर खूपच सुंदर आणि आकर्षक आहे. पांढऱ्या-निळ्या रंगाच्या भिंती, विंटेज लाकडी फर्निचर, पुस्तकांची कपाटं, डायनिंग एरिया ही या व्हिलाची वैशिष्ट्ये आहेत. गोव्यातील निसर्गाच्या सानिध्यात वसलेला हा सुंदर व्हिला वास्तुकलेचं उत्तम उदाहरण आहे.

'मनी कंट्रोल'ने दिलेल्या वृत्तानुसार, या व्हिलामध्ये आता पर्यटकांनाही राहता येणार नाही. त्यासाठी प्रति रात्र 75 हजार रुपये भाडं त्यांना मोजावं लागणार आहे. या व्हिलाच्या अंगणाच्या मध्यभागी एक मोठा स्विमिंग पूल असून त्याच्या सभोवताली लाकडी डेक आहे.

या व्हिलाचं मुख्य प्रवेशद्वार आणि बाहेरील बाल्कनीच्या खिडक्या यातून पोर्तुगीत वारसा पहायला मिळतो. तर जिन्यावरील रंगीबेरंगी नक्षीदार फरशा, लाकडी दरवाजा यातून राजेशाही थाट जाणवतो. या व्हिलाचा लिव्हिंग एरिया अत्यंत सुरेख पद्धतीने सजवण्यात आला आहे.

व्हिलामधील बेडरुम हे नैसर्गिक प्रकाश आणि शांत रंग यांचा मिलाफ साधत डेकोरेट केलेलं आहे. सागवानी पलंग, जाळीदार हेडबोर्ड आणि आकर्षक हँगिंग दिवे यामुळे बेडरुममध्ये सुंदर आणि तितकंच आरामदायी वातावरण निर्माण झाल्याचं पहायला मिळतंय.

भिंतीवरील हे कपाट पारंपरिक आणि आधुनिक कलेचा एक सुंदर नमुना आहे. एका बाजूला गडद निळा आणि दुसऱ्या बाजूला सोनेरी-पिवळ्या रंगांनी हे कपाट सजवण्यात आलं आहे. वाचनाची आवड असणाऱ्यांसाठी व्हिलामधील हा एक कोपरा खूपच खास ठरणार आहे.

व्हिलाच्या बाहेरही सुंदर बाग असून विश्रांतीसाठी हे सुंदर आश्रयस्थान आहे. दगडी पायवाटा, हिरवंगार लॉन आणि सर्वत्र विविध प्रकारची झाडं.. यातून ताजेपणा जाणवतो. इथं झाडाच्या सावलीत लाकडी खुर्ची आणि लहान टेबलाजवळ चहाचा कप आणि पुस्तक घेऊन वेळ घालवणं अत्यंत आरामदायी ठरेल.

ज्यांना कुटुंबीयांसोबत किंवा मित्रमैत्रिणींसोबत गोव्यात निवांत वेळ घालवायचा असेल तर अर्शद वारसीचा हा व्हिला उत्तम पर्याय ठरू शकेल. पर्यटकांसाठी लागणाऱ्या सर्व सोयीसुविधा यात देण्यात आल्या आहेत.