भोंदूबाबा अमावस्या, पौर्णिमेच्या दिवशीच यायचा… त्या गोष्टींमुळे गावकरीही व्हायचे भयभीत; आजही मनात धसका
सध्या राज्यात लिंगपिसाट अशोक खरातची चर्चा रंगली आहे. त्याने अनेक महिलांवर अत्याचार केले. तसेच काही गावकऱ्यांना लूबाडून त्यांच्याकडून जमीन खरेदी केल्याचे समोर आले आहे. आता गावकऱ्यांनी धक्कादायक सत्य सांगितेल आहे.

नाशिक जिल्ह्यातील पाथर्डी शिवारात 'भोंदू बाबा' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कॅप्टन अशोक खरात याने कोट्यवधी रुपयांची जमीन मालकी हक्कात ठेवली आहे. सुमारे ३० एकर क्षेत्र असलेल्या या जमिनीची बाजारभावाने १५० कोटी रुपयांपेक्षा अधिक किंमत आहे. या सर्व जागा कंपाऊंड करून बंदिस्त केल्या आहेत, ज्यामुळे स्थानिक ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

गावकऱ्यांच्या माहितीनुसार, अशोक खरात हा अमावस्या आणि पौर्णिमेच्या दिवशीच आपल्या या जमिनी बघण्यासाठी येत असे. या दिवशी तो एजंट किंवा सहकाऱ्यांसोबत येऊन जागांचे निरीक्षण करत असे. अनेकदा त्याच्याबरोबर दीपक लोंढे नावाचा एजंटही असायचा. लोंढे हा सिन्नर परिसरातील जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवसायात सक्रिय असून, खरातच्या अनेक व्यवहारांत त्याचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त होत आहे.

ग्रामस्थ सांगतात की, खरात आणि त्याच्या साथीदारांनी काही वेळा गावात दमदाटी करण्याचा प्रयत्न केला. जमीन व्यवहारात पैसे बुडवल्याचेही आरोप आहेत. काही शेतकरी किंवा स्थानिकांकडून त्याने जमीन विकत घेतली असता, पूर्ण रक्कम न देता किंवा इतर प्रकारे फसवणूक केल्याच्या तक्रारी आहेत. या सर्व घटनांमुळे गावकऱ्यांच्या मनात खरातबाबत भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. आजही त्याच्या नावाने गावात धसका बसतो.

तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, पाथर्डी आणि गौळाणे शिवारात खरातच्या कुटुंबीयांच्या (पत्नी कल्पना, मुली तृप्तिबाला आणि सृष्टी) नावावरही स्वतंत्र जमिनी आणि भूखंड नोंदवलेले आहेत. या सर्व मालमत्तेची किंमत ३० कोटींपेक्षा अधिक असल्याचे सांगितले जाते. एसआयटी (विशेष तपास पथक) आणि आयकर विभागाकडून या जमिनींच्या स्रोतांची, खरेदीखतांची आणि व्यवहारांची सखोल चौकशी सुरू आहे.

खरात प्रकरणात आता जमीन माफिया, फसवणूक आणि प्रभाव क्षेत्रापर्यंत तपास पोहोचला आहे. पाथर्डीतील ही अफाट जमीन आणि गावकऱ्यांच्या भीतीच्या कहाण्या आता राज्यभर चर्चेत आहेत. ग्रामस्थ म्हणतात, "तो येत असे तेव्हा गावात अस्वस्थता यायची... आता न्याय मिळेल का, हे पाहायचे आहे."