
२०२५ च्या आशिया कपच्या सुपर फोरमध्येही भारताने पाकिस्तानला हरवले. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने 171 धावा केल्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना शुभमन गिल आणि अभिषेक शर्मा यांनी पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी (105) केली. सलग दोन अपयशांनंतर, सुपर फोरच्या महत्त्वाच्या सामन्यात गिलने 47 धावा केल्या. त्यांच्यामुळे भारताचा विजयाचा मार्ग सोपा झाला.

मात्र या मॅचमध्ये बराच ड्रामा पहायला मिळाला. पाकचे खेळाडू विचित्र वागत होते, भारतीय खेळाडूंशी उगीचच वाकडं वागत होते. मात्र ते पाहून अभिषेक आणि गिलही गप्प बसले नाही, त्यांनी देखील थेट प्रत्युत्तर दिलं. गेल्या मॅचमध्ये नौ हँडशेकमुळे झालेल्या वादानंतर पाकिस्तानने अभ्यास करण्याऐवजी, दुसऱ्या खेळाडूंना चिडवायचं कसं यावर जास्त भर दिला. पण त्याचा परिणाम असा झाला की सलग दुसऱ्या सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली.

टीम इंडियाच्या विजयानंतर शुबमन गिलने सोशल मीडियावर एक पोस्ट पोस्ट केली. त्याने सामन्यातील चार फोटो शेअर केले आणि त्यासोबत अवघी 4 शब्दांची पोस्ट लिहीली. Game speaks, not words ( खेळ बोलतो, शब्द नाही) असं त्याने नमूद केलं.

हेच वास्तव आहे, दुसऱ्या संघाला शब्दांनी, बोलून त्रास देणे हा खेळाच्या रणनीतीचा एक भाग असू शकतो पण केवळ याच्या मदतीने तुम्ही सामना जिंकू शकत नाही असंच त्याने सुनावलंय.

त्याचे हे ट्विट बघता बघता प्रचंड व्हायरल झालं असून अनेकांनी त्यावर कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. टीम इंडियाविरुद्ध 15 वा टी-20 सामना खेळणाऱ्या पाकिस्तानचा कालचा, तब्बल 12 वा पराभव होता. टी-20 क्रिकेटमध्ये पाकिस्तानने भारताला फक्त तीन वेळा पराभूत केले आहे.

दरम्यान कालच्या विजयामुळे, टीम इंडिया आता आशिया कप 2025 स्पर्धेत सुपर4 मध्ये पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानावर पोहोचली आहे.