
काटेपूर्णा जलाशयातील मानवनिर्मित द्वीपावर शेकडो पाणपक्ष्यांचा वावर कायमस्वरूपी पाहायला मिळतो.या पार्श्वभूमीवर आज संपूर्ण आशिया खंडात एकाच वेळी पाणपक्षी गणना करण्यात येत असून, काटेपूर्णा अभयारण्यातील जलाशयावरही पक्ष्यांची संख्या व प्रजातींची सविस्तर नोंद वाशीम आणि अकोला जिल्ह्यातील पक्षी अभ्यासकांमार्फत घेतली जात आहे.

वाशीम येथील वत्सगुल्म जैवविविधता संवर्धन संस्था आणि अकोला येथील निसर्ग कट्टा यांनी पुढाकार घेऊन ही पाणपक्षी गणना आयोजित केली आहे...जैवविविधतेचा अभ्यास, स्थलांतरित पक्ष्यांच्या मार्गांचा मागोवा आणि पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने ही गणना अत्यंत महत्त्वाची मानली जाते.

वन विभागाच्या मार्गदर्शनाखाली तज्ज्ञ, पक्षी अभ्यासक आणि स्वयंसेवकांच्या सहभागातून ही प्रक्रिया राबविण्यात येत आहे अशी माहिती वाशीम-अकोला येथील पक्षी अभ्यासक मिलिंद सावदेकर व अमोल सावंत यांनी दिली.

वाशीम जिल्हा हा उत्तरेकडून दक्षिणेकडे स्थलांतर करणाऱ्या अनेक पक्ष्यांसाठी महत्त्वाचा थांबा ठरत असून, दरवर्षी जानेवारी महिन्यात विविध देशांतून येणारे विदेशी स्थलांतरित पक्षी जिल्ह्यातील जलाशय, नद्या व अभयारण्यांमध्ये मोठ्या संख्येने दाखल होतात.

दरम्यान आज झालेल्या पानपक्षी गणनेत करडा बगळा, सापमाने पाणपक्षी,लहान पाणकावळा काळ्या पंखांची टिटवी, जांभळा जलकोंबडा, रिव्हर टर्न, सामान्य पाणबदक, आशियाई चमचाबगळा, मोठा जाडघोट्या टिटवी, उत्तरी, शेपटाबदक, सुरखाब बदक आदी पान पक्षांचे दर्शन झाले.