
बदलापुरात जनता रस्त्यावर उतरली आहे. एका नामांकीत शाळेत दोन चिमुकलींवर झालेल्या अत्याचाराविरोधात जनतेच्या मनात चीड, संतापाची भावना आहे. त्यामुळे आज बदलापूर बंदची हाक देण्यात आली आहे.

बदलापुरातील शाळा परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. बदलापुरात जमलेल्या आंदोलकांची संख्या लक्षात घेता पोलीस रस्त्यावर उतरले आहेत.

बदलापूर रेल्वे स्थानकात मागच्या काही तासांपासून रेल रोको आंदोलन सुरु आहे. त्यामुळे कल्याण-कर्जत मार्गावरील रेल्वे वाहतूक ठप्प आहे.

वारंवार विनंती करून आंदोलक माघार घेत नसल्याने गर्दी कमी करण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर करण्याचा प्रयत्न केला. मात्र संतप्त आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली.

दगडफेकी नंतर पोलिसांनी काढता पाय घेतला. सध्या पुन्हा एकदा पोलिसांनी शांततेची भूमिका घेतली. हात जोडून आंदोलकांना शांत करण्याचा प्रयत्न सुरू. दगडफेकीत तीन ते चार पोलीस जखमी झाल्याची प्राथमिक माहिती.