
छोट्या पडद्यावरील वादग्रस्त पण तितकाच लोकप्रिय म्हणून ओळखला जाणारा बिग बॉस मराठीचा सहावा सिझन सध्या चांगलाच चर्चेत आहे. 'बिग बॉस मराठी' सीझन ६ च्या घरात आतापर्यंत अनेक जोड्या चर्चेत राहिल्या आहेत. आयुष-संजीव आणि तन्वी, रुचिता-विशाल, तसेच राखी-विशाल अशा काही रोमँटिक कनेक्शन घरात रंगले आहेत. पण आता या यादीत नवीन नाव जोडलं गेलं आहे – चक्क 'छोटा डॉन' म्हणून ओळखला जाणारा प्रभू शेळके!

प्रभूने घरातील एका सदस्याला थेट सांगितलं की, "मला तू आवडलीस!" त्याने तिच्यासमोर जाऊन स्पष्टपणे म्हटलं, "मला तू आवडलीस म्हणून मी तुझ्या मागे लागलो आहे." यावर त्या सदस्याने विचारलं, "मला तू आवडलीस म्हणजे काय? ताई म्हणून का?" प्रभूने ताबडतोब उत्तर दिलं, "नाही, ताई नाही. आता ताईचा शॉट संपला. मी तन्वीला सोडून आता तुला धरलंय. ती ताईच आहे, पण आता तू माझी बेस्ट फ्रेंड आहेस!"

नंतर नाश्त्याच्या वेळी सगळे एकत्र बसले तेव्हा प्रभू तिच्याच शेजारी बसला. त्याने बिग बॉसला ओरडून सांगितलं, "बिग बॉस, मला तन्वीच्या मागे फिरून आता वैताग आलाय. खूप टेन्शन झालंय. आता मला रुचिता आवडते!" रुचिताने लगेच विचारलं, "आवडते म्हणजे काय? गेमसाठी का?" प्रभू लाजत म्हणाला, "नाही, तू मला खरंच आवडतेस. आता तुझ्यासोबत खेळायचंय."

यावर राखीने त्याला चिडवत म्हटलं, "तो २० वर्षांचा आहे आणि तू २२ वर्षांची आहेस. काय होतंय त्याला?" प्रभूने हसत उत्तर दिलं, "२७-२८ असलं तरी काही फरक पडत नाही!"

आतापर्यंत प्रभू तन्वीच्या मागे मागे फिरताना दिसत होता आणि घरातील सदस्य त्याला याबाबत सतत ट्रोल करत होते. त्यामुळे आता त्याने तन्वीला सोडून रुचितावर लक्ष केंद्रित केलं आहे. घरात हे नवं प्रेमकथेचं ट्विस्ट सगळ्यांना उत्सुकता निर्माण करत आहे. पाहूया पुढे काय घडतं...