
इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध सध्या थांबलेले आहे. दोघांमध्येही शस्त्रसंधी करार झालेला आहे. असे असले तरी इस्रायलकडून गाझावरील बॉम्बफेक थांबवलेली नाही. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू यांनी आमचे सैन्य अभियान अजूनही संपलेले नाही, असा इशारा दिला आहे.

बेंजामीन नेतान्याहू यांनी सोमवारी (20 ऑक्टोबर) इस्रायली संसदेत हमाससोबतच्या युद्धाबाबत माहिती दिली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार इस्रायली सैन्याने गाझावर तब्बल 150 टन बॉम्ब फेकले आहेत.

हमासने शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्यानंतर इस्रायलने प्रत्युत्तरादाखल ही कारवाई केलेली आहे, असे यावेळी नेतान्याहू यांनी सांगितले आहे. आमच्या एका हातात शस्त्र आहे तर दुसरा हात आम्ही शांततेसाठी पुढे केलेला आहे, असे म्हणत हमास हल्ले करत असेल तर आम्हीदेखील जशास तसे उत्तर देऊ, असा इशाराच नेतान्याहू यांनी दिला आहे.

हमासने राफामधील इस्रायली सैन्यावर हल्ला केला होता. या हल्ल्यानंतर आता इस्रायलने हवाई हल्ले सुरू केले आहेत. असे असताना नेतान्याहू यांनी केलेल्या या विधानानंतर आता गाझा पट्टीतील युद्ध पुन्हा पेटणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

दुसरीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हमास-इस्रायल यांच्यातील युद्ध थांबवण्यासाठी प्रयत्न केले आहेत. असे असताना इस्रायली सैन्याची मोहीम संपलेली नाही, असे नेतान्याहू म्हणाल्यामुळे ट्रम्प यांनाही हा धक्का असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आता भविष्यात काय होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.