
सणांची मजा तेव्हा द्विगुणीत होते जेव्हा संपूर्ण परिवार एकत्र येतो. गणेशोत्सव जल्लोषात साजरा केल्यानंतर आता स्टार प्रवाह परिवार ढिंचॅक दिवाळी साजरी करण्यासाठी सज्ज झालाय.

फराळाइतकाच खमंग कॉमेडीचा तडका आणि फटाक्यांच्या आतषबाजीप्रमाणे लखलखते कलाकारांचे परफॉर्मन्स दिवाळी विशेष कार्यक्रम आणखी स्पेशल करणार आहेत.

स्टार प्रवाहच्या परिवारासोबतच एक नवी जोडी यंदाची दिवाळी गाजवणार आहे. विनोदाचं अचूक टायमिंग साधून खळखळून हसवण्यासाठी महाराष्ट्राचे लाडके विनोदवीर अर्थातच निलेश साबळे आणि भाऊ कदम प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

निलेश साबळे आणि भाऊ कदम यांना एकत्र पाहण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र उत्सुक होता. अखेर ही प्रतीक्षा संपणार आहे. स्टार प्रवाहच्या 'ढिंचॅक दिवाळी' कार्यक्रमाच्या निमित्ताने ही जोडी पुन्हा एकत्र येतेय. प्रेक्षकांप्रमाणेच भाऊ कदम आणि निलेश साबळे देखिल या कार्यक्रमासाठी प्रचंड उत्सुक आहेत.

याविषयी सांगताना डॉ. निलेश साबळे म्हणाले, "खूप दिवसांपासून प्रेक्षक वाट पाहत होते. दिवाळीच्या शुभमुहूर्तावर मी आणि भाऊ कदम स्टार प्रवाहच्या ढिंचॅक दिवाळी कार्यक्रमात काहीतरी भन्नाट घेऊन येतोय."

"भाऊसोबत काम करताना नेहमीच मजा येते. भाऊला मी कळलोय आणि मला भाऊ कळलाय असं म्हटलं तरी चालेल. गेली 15 वर्षे आम्ही एकत्र काम करतोय. भूमिकेचं सोनं करणारा नट लेखकाला हवा असतो. भाऊ कदमचं पण काहीसं असंच आहे," असं ते म्हणाले.

"प्रत्येक भूमिकेचं तो सोनं करतो. या कार्यक्रमातही प्रेक्षकांसाठी निखळ मनोरंजन असेल," अशी भावना निलेश साबळे यांनी व्यक्त केली.

भाऊ कदम म्हणाले, "यंदाची दिवाळी खऱ्या अर्थाने ढिंचॅक असणार आहे. स्टार प्रवाहसोबत मी पहिल्यांदा काम करतोय त्यामुळे प्रचंड उत्सुकता आहे. निलेश साबळेसोबत इतक्या वर्षांची मैत्री आहे. हीच मैत्री निराळ्या ढंगात प्रेक्षकांसमोर येईल."