भाड्याच्या छोट्याशा खोलीतून आज..; 25 व्या वर्षी ‘बिग बॉस मराठी’ फेम अनुश्री मानेनं घेतलं हक्काचं घर
बिग बॉस मराठीच्या सहाव्या सिझनमध्ये आपल्या दमदार खेळीने प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडणारी स्पर्धक अनुश्री माने हिनं वयाच्या अवघ्या 25 व्या वर्षी हक्काचं घर घेतलं आहे. या घराच्या वास्तुशांतीला बिग बॉसचे अनेक स्पर्धक उपस्थित होते.

भाड्याच्या एका छोट्याशा खोलीतून सुरू झालेला प्रवास आज इथपर्यंत येऊन पोहोचला आहे. कितीतरी अश्रू, कितीतरी अपयश, कितीतरी जागलेल्या रात्री.. पण स्वप्नांवरचा विश्वास कधी सोडला नाही, असं म्हणत 'बिग बॉस मराठी 6' फेम अनुश्री माने हिनं नवीन घर घेतल्याची आनंदाची बातमी चाहत्यांना दिली आहे.

अनुश्री मानेनं पिंपरी-चिंचवड इथं तिच्या हक्काचं घर घेतलं असून या नवीन घरात तिने गृहप्रवेशाची पूजा केली आहे. अनुश्रीच्या या आनंदात बिग बॉस मराठीतील काही माजी सदस्यसुद्धा सहभागी झाले आहेत. तन्वी कोलते, रोशन भजनकर, ओमकार, रुचिता जामकर, विशाल कोटियन, राधा पाटील, प्रभू शेळके हे सर्वजण पूजेला उपस्थित होते.

आज माझ्या स्वतःच्या घराची वास्तुशांती करताना हवनाच्या त्या ज्वाळांमध्ये मला माझा संपूर्ण प्रवास दिसतोय. हे घर फक्त विटा आणि सिमेंटचं नाही. हे माझ्या आईच्या त्यागाचं, माझ्या कष्टाचं, आणि बाबांच्या आशीर्वादाचं स्वप्न आहे, अशा शब्दांत अनुश्री व्यक्त झाली.

सोशल मीडियावर लिहिलेल्या पोस्टमध्ये तिने पुढे म्हटलंय, 'आज मन भरून आलंय. कारण एकेकाळी डोक्यावर स्वतःचं छप्पर असावं असं स्वप्न पाहणारी मुलगी, आज तिच्या स्वतःच्या घरात देवाचं स्वागत करतेय. बाबा, तुम्ही आज असता तर सर्वात जास्त आनंद तुम्हालाच झाला असता.'

धनंजय पोवारनेही अनुश्रीच्या नवीन घरात तिची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या आहेत. अनुश्रीच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. इतक्या कमी वयात अनुश्रीने हक्काचं घर घेतल्याने नेटकरी तिचं कौतुक करत आहेत.