एका चार्जमध्ये 728 किमी रेंज, रणवीरने खरेदी केली प्रचंड महागडी कार, किंमत ऐकूनच सर्व थक्क
बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंहच्या कार कलेक्शनमध्ये आणखी एका कारचा समावेश झाला आहे. ही कार कंपनीच्या दाव्यानुसार एका चार्जमध्ये तब्बल 728 किलोमीटर अंतर पार करते. या कारची किंमत किती?

बॉलिवूडचा सुपरस्टार रणवीर सिंह याच्या कार कलेक्शनमध्ये आणखी एका आलिशान गाडीची भर पडली आहे. रणवीरने BMW कंपनीची ऑल-इलेक्ट्रिक सेडान BMW i7 खरेदी केली आहे.
या कारची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत तब्बल 1.95 कोटी रुपये आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये रणवीर या गाडीची डिलिव्हरी घेताना आणि स्वतः कार चालवताना दिसत आहे.
रणवीरने BMW i7 चा नेमका कोणता व्हेरिएंट खरेदी केला, याची अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र, मीडिया रिपोर्ट्सनुसार त्याने 'i7 50 xDrive M Sport' हा व्हेरिएंट घेतल्याची शक्यता आहे.
या कारमध्ये 112.5 kWh क्षमतेची बॅटरी असून ती 455 bhp पॉवर आणि 600 Nm टॉर्क निर्माण करते. ही इलेक्ट्रिक सेडान अवघ्या 5.5 सेकंदांत 0 ते 100 किमी प्रतितास वेग गाठू शकते. तसेच, एका चार्जमध्ये ती WLTP दाव्यानुसार 728 किलोमीटरपर्यंत धावू शकते.
फीचर्सच्या बाबतीतही BMW i7 अत्यंत शानदार आहे. या कारमध्ये मागील प्रवाशांसाठी 31.3 इंचांची 8K थिएटर स्क्रीन, 14.6 इंचांचा डिस्प्ले, पॅनोरमिक हेड-अप डिस्प्ले आणि मसाज, हीटिंग व व्हेंटिलेशन सुविधांसह आरामदायी सीट्स देण्यात आल्या आहेत.