कोणी नाव बदललं, तर कोणी अंगठ्या घातल्या; बॉलिवूडच्या कलाकारांचे लकी चार्म्स आहेत तरी काय ?
बिग बी, शाहरुख खान ते अजय देवगण.. बॉलिवूडमधले असे काही कलाकार ज्यांचा ज्योतिषशास्त्र आणि अंकशास्त्रावर गाढ विश्वास आहे. त्यानुसार, त्यांनी काही बदलही केलेत.

फिल्म्स, फिल्ममेकिंग.. सामान्य प्रे7कांच्या दृष्टीने हे फक्त मनोरंजन झालं, पण अभिनेते आणि चित्रपटसृष्टीत काम करणाऱ्यांसाठी हे क्षेत्र म्हणजे कोट्यवधींचा जुगार देखील आहे. चित्रपट जगतात प्रत्येक शुक्रवारी बॉक्स ऑफिसवर अनेक लोकांच्या नशिबाचा निर्णय होतो. अभिनेता असोत किंवा चित्रपटनिर्माते, त्यांच्या चित्रपटांच्या हिट होण्याची शक्यता जास्तीत जास्त वाढवण्यासाठी प्रत्येक मार्ग वापरतात. आकडेवारी आणि रिसर्च अँड ॲनॅलिसिसव्यतिरिक्त ज्योतिषाशी संबंधित प्रत्येक शक्यतेकडेही लक्ष दिले जाते. इंडस्ट्रीत अनेक अभिनेते आणि चित्रपटनिर्माते असे आहेत, ज्यांचा ज्योतिषावर अढळ विश्वास आहे. आज अशा काही सेलिब्रिटींबद्दल जाणून घेऊयात. ( All Photos : Social Media)
या यादीत सर्वात पहिले नाव एकता कपूरचं आहे. ज्योतिषशास्त्र आणि अंकशास्त्रावर विश्वास ठेवणाऱ्यांमध्ये एकता कपूरचं नाव आघाडीवर घेतले जातं. आपल्या अनेक मालिका आणि चित्रपटांची नावं ‘K’ या इंग्रजी अक्षराने सुरू करण्यासाठी ती ओळखली जाते. ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ आणि ‘कहानी घर घर की’ यांसारख्या मालिकांव्यतिरिक्त तिने आपल्या महाभारत मालिकेचे नावही ‘कहानी महाभारत की’ असे ठेवले होते. याशिवाय, आपल्या प्रोजेक्ट्सच्या लॉन्चिंग आणि रिलीजच्या तारखाही ती ज्योतिषीय गणनेनुसार ठरवते. एकता कपूरच्या हातातील अनेक अंगठ्या या गोष्टींवरील तिच्या विश्वासाबद्दलची कहाणी सांगतात .
महानायक अमिताभ बच्चन यांचा ज्योतिषशास्त्र आणि रत्नांवर ठाम विश्वास असल्याचे सांगितले जाते. त्यांच्या आयुष्यातील कठीण काळात ज्योतिषीय सल्ल्यानुसार त्यांनी नीलम आणि पाचू ही रत्ने धारण करण्यास सुरुवात केली होती. याशिवाय, चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या तारखा आणि परदेश दौऱ्यांसाठीही ते आजही शुभ मुहूर्ताचा विचार करतात.
अमिताभ बच्चन यांच्याप्रमाणेच शाहरुख खानचाही अंकशास्त्रावर विश्वास असल्याचं सांगितलं जातं. 555 हा त्याचा लकी नंबर मानला जातो. त्याच्या आयुष्यात अनेक ठिकाणी हा आकडा पाहायला मिळतो. गाडीच्या नंबर प्लेटपासून ते त्याच्या वैयक्तिक कर्मचाऱ्यांच्या फोन नंबरपर्यंत 555 हा आकडा असावा, याची ते काळजी घेतली जाते, असं म्हटले जाते. याशिवाय, आपल्या चित्रपटांच्या प्रदर्शनासाठीही तो शुभ तारखांना प्राधान्य देतो.
चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहरवरही दीर्घकाळ अंकशास्त्राचा प्रभाव होता. ज्योतिषीय सल्ल्यानुसार त्याने आपल्या चित्रपटांची नावे ‘K’ या अक्षराने सुरू करण्याचा पॅटर्न स्वीकारला होता. ‘कुछ कुछ होता है’, ‘कभी खुशी कभी गम’ आणि ‘कल हो ना हो’ ही त्याची काही उदाहरणे आहेत. मात्र, नंतर करण जोहरने हा पॅटर्न बदलला. आता तो शुभ तिथी आणि मुहूर्तांवर अधिक विश्वास ठेवतो..
राकेश रोशन यांनीही दीर्घकाळ ‘K’ या अक्षराने सुरू होणाऱ्या चित्रपटांची निर्मिती केली. ‘कहो ना प्यार है’, ‘कोई मिल गया’, ‘क्रिश’ आणि ‘काबिल’ यांसारख्या त्यांच्या अनेक चित्रपटांची नावे ‘K’ या अक्षराने सुरू होतात. विशेष म्हणजे, हे सर्व चित्रपट हिट ठरले होते. मात्र, या यादीत केवळ चित्रपट निर्मातेच नाहीत, तर बॉलिवूडमधील अनेक लोकप्रिय कलाकारांचाही समावेश आहे.
अजय देवगण - ज्योतिषशास्त्र आणि अंकशास्त्रावरील विश्वासामुळे अजय देवगणने आपल्या आडनावाच्या इंग्रजी स्पेलिंगमध्ये बदल केला होता. त्याने ‘Devgan’ ऐवजी ‘Devgn’ असे स्पेलिंग वापरण्यास सुरुवात केली. याशिवाय, तो आपल्या बोटात पिवळा पुष्कराज धारण करतोत. चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या तारखा निश्चित करतानाही तो ज्योतिषी आणि अंकशास्त्रज्ञांचा सल्ला घेतो