
आजच्या धावपळीच्या जीवनात वेळेअभावी अनेक लोक नाश्त्यासाठी पटकन तयार होणारे पदार्थ जसे की ब्रेड ऑम्लेट किंवा मॅगी खाण्यास प्राधान्य देतात. दिवसभर ऊर्जा मिळवण्यासाठी नाश्ता महत्त्वाचा असतो, म्हणून तो पौष्टिक असावा असे आरोग्य तज्ञ सांगतात. मात्र, ब्रेड ऑम्लेट रोज खाणे आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे, यावर तज्ञांनी काही महत्त्वपूर्ण बाबी स्पष्ट केल्या आहेत.

ब्रेड ऑम्लेट हा जलद तयार होणारा आणि काही प्रमाणात पोषक असलेला नाश्ता आहे. यात वापरले जाणारे अंडे हे प्रथिनांचा (Proteins) उत्तम स्रोत असते. अंड्यांमधील उच्च दर्जाची प्रथिने स्नायूंच्या दुरुस्तीसाठी आणि चयापचय (Metabolism) सुधारण्यासाठी मदत करतात.

तज्ञांनुसार, ब्रेड ऑम्लेट खाणे हे प्रामुख्याने तुम्ही ते कसे बनवता आणि किती प्रमाणात खाता यावर अवलंबून असते. सामान्यतः आठवड्यातून फक्त दोनदा अंडी खाणे पुरेसे असते.

अंड्यांमधील अमीनो आम्ल केस, नखे आणि त्वचेच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे ठरतात. तसेच ब्रेडमधील कर्बोदके आणि अंड्यातील प्रथिने व चरबी यांच्या संयोगाने शरीराला त्वरित ऊर्जा मिळते.

'जर्नल ऑफ द अमेरिकन हार्ट असोसिएशन' च्या अभ्यासानुसार, आठवड्यातून ७ पेक्षा जास्त अंडी खाणाऱ्या निरोगी लोकांनाही हृदयरोगाचा धोका वाढू शकतो. कोलेस्टेरॉलची समस्या असणाऱ्यांसाठी हे अधिक धोकादायक आहे.

पोषक घटक मिळवण्यासाठी मल्टी-ग्रेन ब्रेड वापरणे चांगले असते. कारण यात फायबर असते आणि ते पचनास मदत करते. मैद्यापासून बनवलेला साधा ब्रेड फायबरविरहित असतो आणि तो रक्तातील साखरेची पातळी वेगाने वाढवतो.

ऑम्लेट बनवताना जर सॅच्युरेटेड फॅट्स (Saturated Fats) असलेले तेल किंवा बटर जास्त प्रमाणात वापरले गेले, तर तो नाश्ता आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतो.

ब्रेड ऑम्लेट शरीराला जलद ऊर्जा देत असले तरी, ब्रेडमधील कमी पोषण आणि जास्त कॅलरी तसेच ऑम्लेट बनवताना वापरल्या जाणाऱ्या चरबीमुळे या नाश्त्याचे पौष्टिक मूल्य कमी होते.त्यामुळे ब्रेड ऑम्लेट दररोज नाश्त्यात खाणे योग्य नाही. यामुळे शरीरात पोषक तत्वांची कमतरता निर्माण होऊ शकते.