
चीन हा देश नेहमीच विस्तारवादाची भूमिका घेत आलेला आहे. स्वत:चा विस्तार करायचा असेल तर आपले सैन्य बळकट हवे, हे चीनला चांगलेच माहिती आहे. त्यामुळेच हा देश सैन्यावर दरवर्षी कित्येक हजार कोटी रुपये खर्च करतो.

दरवर्षी केलेल्या तरतुदीतून चीन हा देश सैनिकांसाठी अत्याधुनिक शस्त्रांची निर्मिती आणि खरेदी करतो. सोबतच अत्याधुनिक विमाने, युद्धनौका, विमानवाहू जहाजांची चीन खरेदी तसेच निर्मिती करतो.

सध्या चीन आपल्या नौसेनेची ताकद वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून चीन सध्या चौथे मोठे विमानवाहू जहाज तयार करत आहे.

चीनचे फुजियान नावाचे तिसरे विमानवाहू जहाज लवकरच नौसेनेच्या ताफ्यात सामील होणार आहे. असे असतानाच आता चीनने आपल्या चौथ्या एअरक्राफ्ट कॅरियरचीही निर्मिती चालू केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार लियाओनिंग प्रांतातील डालियान शहरात एका शिपयार्डामध्ये या चौथ्या लढाऊ विमानवाहू जहाजाची निर्मिती केली जात आहे. या ठिकाणाच्या काही सॅटेलाईट इमेजेस समोर आल्या आहेत.

या इमेजेसमध्ये चीनचे तयार होत असलेले हे चौथे विमानवाहू जहाज दिसत आहे. दरम्यान, चीन समुद्रातील आपली ताकद वाढवण्याच्या प्रयत्नात असताना आता भारताला अधिक सजग राहण्याची गरज व्यक्त केली जात आहे.