
चीनच्या संशोधकानी एक अनोखा शोध लावला आहे. या शोधामुळे आता कधीकाळी पृथ्वीवरचा सर्वात मोठा प्राणी म्हणून ओळख असलेल्या डायनासोअरच्या अंडे नेमके किती वर्षांपूर्वीचे आहेत, हे समजले आहे. या शोधामुळे संपूर्ण जगाचे लक्ष चीनकडे वेधले गेले आहे.

चीनमधील युनयांगमधील किंगलोंगशान या भागात मिळालेल्या डायनासोअरच्या अंड्यांचे नेमके वय समजून आले आहे. संशोधकांच्या शोधानुसार या अंड्यांचे वय साधारण 8.5 कोटी वर्षे आहे. म्हणजेच हे अंडे साधारण 8.5 कोटी वर्षापूर्वीचे आहेत.

याआधी संशोधक अशा प्रकारचे पुरातन अंडे जिथे मिळाले त्या भागातील घडक, पर्वतांच्या राखेचा अभ्यास करून अंड्यांचे नेमके वय शोधले जायचे. यावेळी मात्र चीनच्या संशोधकांनी युरेनियम-लीड डेटिंगच्या मदतीने डायनासोअरचे अंडे नेमके किती वर्ष जुने आहे हे शोधून काढले आहे.

चीनच्या संशोधकांचा हा शोध Frontiers in Earth Science नावाच्या जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे. संशोधकांनी एकूण 28 अंड्यांपैकी एक अंडे घेतले आणि त्याचा चिरून मायक्रो लेझरच्या मदतीने त्या अंड्यातील कार्बोनेट मिनरल्सचे वाफेत रुपांतर केले. त्यानंतर त्या अंड्यात किती प्रमाणात कॅल्शियम आणि किती प्रमाणात लिड आहे याचा अभ्यास करण्यात आला.

याच अभ्यासातून डायनासोअरच्या या अंड्यांचे वय 8.5 कोटी असल्याचे समोर आले आहे. हे अंडे क्रेटेशिअस काळातील आहेत, असे चीनच्या संशोधकांचे मत आहे. दरम्यान, आता या नव्या शोधानंतर डायनासोअरचे अस्तित्व, पृथ्वीवरील जीवसृष्टी तसेच इतर महत्त्वाच्या बाबींवर सोशधन करण्यास फार मदत होणार आहे. त्यामुळेच चीनच्या संशोधकांच्या या शोधाने जगाचे लक्ष वेधले आहे.