
अभिनेत्री अंगिरा धरसोबत आपण लग्न गाठ बांधल्याचं अभिनेता आणि दिग्दर्शक आनंद तिवारी यांनी शुक्रवारी चाहत्यांना सांगितलं आहे. यावर्षी एप्रिलमध्ये त्यांचं लग्न झालं. आनंद तिवारी यांनी इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत याबद्दल माहिती दिली आहे.

त्यांनी फोटो शेअर करत लिहिलं, " 30 एप्रिलला, अंगिरा आणि मी आमच्या मैत्रीचं रुपांतर लग्नात केलं. यावेळी आमचे खास मित्र आणि कुटुंब उपस्थित होते. आता हळूहळू सर्वत्र अनलॉक होत आहे. त्यामुळे आमचा आनंदही आम्ही तुमच्यासोबत अनलॉक करतोय."

आनंद तिवारी आणि अंगिरा धर यांच्या लग्नाची बातमी समोर आल्यानंतर सोशल मीडियावर प्रतिक्रिया येत आहेत. चाहत्यांसह सेलेब्सही या दोघांचं अभिनंदन करत आहेत.

अनन्या पांडे, आहाना कुमरा, आयुष्मान खुराना यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनंदन केलं आहे. आयुष्मानने लिहिलं: 'व्वा! दोघांचं अभिनंदन.'

तर अभिनेत्री अंगिरा धरनंही आपल्या इन्स्टाग्रामवर लग्नाचे हे फोटो शेअर केले आहेत. फोटोमध्ये दोघंही प्रचंड खूश दिसत आहेत.