
बिग बॉसच्या 19 व्या पर्वाला सुरुवात झाली आहे. यावेळी बिग बॉसच्या घरात एकापेक्षा एक स्पर्धक असून टास्क पूर्ण करताना त्यांच्यात चांगलीच चढाओढ पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे यावेळी बिग बॉसच्या घरात ट्रॉफी जिंकण्यासाठी प्रत्येकजण आपापली स्ट्रॅटेजी तयार करताना पाहायला मिळतोय.

दरम्यान, आता भरात आलेल्या बिग बॉसमध्ये आता नवा अनपेक्षित ट्विस्ट येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार बिग बॉसमध्ये आणखी दोन दमदार स्पर्धक येणार असून त्यामुळे ट्रॉफिसाठीची स्पर्धा आणखी वाढणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार बिग बॉसच्या घरात दोन वाईल्ड कार्ड एन्ट्री होणार आहे. म्हणजेच बिग बॉसमध्ये आणखी दोन स्पर्धक वाढणार आहेत. यातील पहिली स्पर्धक ही जगभरात ब्युटी क्विन म्हणून ओळखली जात असून तिचे नाव मेल्ड्रा रोसेनबर्ग असे आहे.

यावेळी वाईल्ड कार्ड एन्ट्री म्हणून गायक आणि कंपोजर साहजेब तेजानी हादेखील बिग बॉसच्या घरात प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे. शाहजेब याचे आतापर्यंत झी म्यूझिक कंपनीसोबत अनेक इंग्रजी, हिंदी गाणे आलेले आहेत. त्याने याआधी पॅरिस फॅशन विकसारख्या ठिकाणी मॉडेलिंगही केलेले आहे. त्यामुळे तोही बिग बॉसमधील दमदार स्पर्धक असेल असे म्हटले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार मेल्ड्रा ही वयाच्या 11 व्या वर्षापासून मॉडेलिंग करते. तिने आतापर्यंत अनेक सौंदर्यस्पर्धा जिंकलेल्या आहे. त्यामुळे बिग बॉसच्या घरात ती नेमकी काय जादू करणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.