
विकी कौशलची प्रमुख भूमिका असलेला "छावा" हा चित्रपट सध्या मोठ्या पडद्यावर धूमाकूळ घालत आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या आयुष्यावर आधारित असलेल्या चित्रपटात रश्मिका मंदाना, अक्षय खन्ना, आशुतोष राणा यांच्याही प्रमुख भूमिका आहे. मात्र त्याशिवाय चित्रपटात अनेक मराठमोळे चेहरेही झळकले असून त्यांनी महत्वाच्या? भूमिका साकारल्या आहेत. या सिनेमातील कोणती भूमिका तु्म्हाला आवडली?

संतोष जुवेकर - संतोष जुवेकरने छावा चित्रपटात रायाजींची भूमिका साकारली आहे. मराठा मावळा म्हणून संतोष जुवेकरने एक वेगळी छाप टाकली आहे. त्याचे या चित्रपटातील अभिनयाचे फारच कौतुक होत आहे.

सारंग साठ्ये - छावामध्ये मराठमोळ्या सारंग साठ्येनेही नकारात्मक भूमिका साकारली आहे. त्याने गणोजी शिर्केचे पात्र रंगवले आहे.

सुव्रत जोशी - तसेच अभिनेता सुव्रत जोशीने यात कान्होजी शिर्के ही भूमिका साकारली आहे. कान्होजी आणि गणोजी शिर्के यांच्या फितुरीमुळेच संभाजी महाराज हे औरंगजेबाच्या तावडीत सापडतात.

नीलकांती पाटेकर - ‘छावा’ सिनेमात ज्येष्ठ अभिनेत्री नीलकांती पाटेकरांनीही काम केलं आहे. त्यांनी या चित्रपटात धाराऊ यांची भूमिका साकारली. धाराऊ या शंभूराजेंच्या दूधआई होत्या.

किरण करमरकर - प्रसिद्ध अभिनेते किरण करमरकर यांनी छावामध्ये अनाजीपंत यांचे पात्र साकारले आहे.

शुभंकर एकबोटे - ‘छावा’मध्ये आणखी एक मराठमोळा अभिनेता झळकला. दिवंगत अभिनेत्री अश्विनी एकबोटे यांचा लेक शुभंकर एकबोटेनेही ‘छावा’मध्ये सरसेनापती धनाजी जाधव यांची भूमिका साकारली आहे.

शिवराज वाळवेकर -छावा चित्रपटात बहिर्जी नाईकांची भूमिका ही देखील एका मराठी अभिनेत्याने साकारली आहे. छावामध्ये बहिर्जी नाईक यांची भूमिका अभिनेता शिवराज वाळवेकर यांनी साकारली आहे. त्यांनी बहिर्जी नाईक साकारताना महाराजांना मदत करताना विविध वेशभूषा रंगवल्या आणि रसिकांच्या मनावर छाप सोडली. त्यांच्या कामाचेही खूप कौतुक होत आहे.

मनोज कोल्हटकर - छावा या चित्रपटात अभिनेते मनोज कोल्हटकर यांनी बालाजी यांचे पात्र साकारले आहे.

आस्ताद काळे - अभिनेता आस्ताद काळे याने या चित्रपटात सूर्या हे पात्र साकारले आहे.

आशिष पतोडे - अभिनेता आशिष पतोडे याने या चित्रपटात अंताजींची भूमिका साकारली आहे.